सोलापूर : सदाशिवनगर (ता . माळशिरस) येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी मोहिते-पाटील गटाने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकून वर्चस्व राखले. १९ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरीत दोन जागांसाठी विरोधकांनी आव्हान दिले होते. परंतु यात मोहिते-पाटील गटाने एकतर्फी बाजी मारली. दोन्ही विरोधी उमेदवारांना आनामत रकम गमवाव्या लागल्या.
हेही वाचा >>> “देवेंद्र फडणवीसांना दंगल घडवून आणायची होती, चक्रव्यूहही रचला, पण…”; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
यापूर्वी अनेक वर्षे आजारी पडलेला आणि दिवंगत माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील आणि त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या ताब्यात असताना श्री शंकर सहकारी साखर कारखाना शेवटी बंद पडून अवसायानात निघण्याच्या स्थितीत होता. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील आणि भाजपचे नेते आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील या चुलत भावंडांमध्ये मागील १०-१५ वर्षांपासून कौटुंबिक आणि राजकीय वैमनस्य कायम आहे. या पार्श्वभूमीवर पाच वर्षांपूर्वी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी हा कारखाना अवसायानात निघण्यापासून वाचवला आणि नंतर संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रियेतून ताब्यात घेतला होता. सध्या हा कारखाना सुरळीतपणे सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असताना आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली १९ जागा बिनविरोध झाल्या. उर्वरीत दोन जागांवर मोहिते-पाटील विरोधक भानुदास सालगुडे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री शंकर बचाव समितीने माळशिरस आणि इस्लामपूर गटातून अनुक्रमे गोपाळ गोरे व उत्तम बाबर यांना उभे केले होते. त्यासाठी सरासरी ६५.६३ टक्के मतदान होऊन मतमोजणी झाली. यात दोन्ही विरोधी उमेदवारांना पराभव पत्करताना आपल्या अनामत रकमाही वाचविता आल्या नाहीत.
हेही वाचा >>> सांगली: बाजार समिती कायदा सुधारणेला विरोध; बंदमुळे २ कोटीची उलाढाल ठप्प
उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे : मोहिते पाटील गट- -माळशिरस ऊस उत्पादक गट- ॲड . मिलिंद कुलकर्णी ( ३५५८ मते ), ॲड. सुरेश पाटील (३५५३) व महादेव शिंदे ( ३४८९ ). विजयी विरूध्द गोपाळ गोरे (२८५).
इस्लामपूर गट-मोहिते-पाटील गट-बाळासाहेब माने (३५६८), कुमार पाटील (३५३६ ) आणि दत्तात्र्यय रणनवरे ( ३४८९ ) विजयी विरूध्द उत्तम बाबर (२९०). पराभूत उमेदवारांना अनामत रक्कम वाचविण्यासाठी किमान ५५० मते मिळणे अपेक्षित होते. परंतु त्यापेक्षाही निम्मीच मते त्यांच्या पदरात टाकून मतदारांनी विरोधकांना झिडकारले. विरोधाला विरोध म्हणून कारखान्यावर निवडणूक लादली गेली. त्यामुळे कारखान्यावर निवडणूक खर्चापोटी १७ लाख रूपयांचा भुर्दंड पडल्याचे भाजपचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले.