अलिबाग- अल्पवयीन मुलीचा विनायभंगा करणाऱ्या आरोपीला अलिबाग सत्र न्यायालयाने तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच ३ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. मोहन दीनानाथ चव्हाण असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश ए एस राजदेकर यांच्या विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी अतिरिक्त शासकीय अभियोक्ता म्हणून स्मिता धुमाळ पाटील यांनी काम पाहिले. सुनावणी दरम्यान २७ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शासकीय अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

हेही वाचा – संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, “आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री आणि…”

हेही वाचा – महायुतीत रस्सीखेच, अजित पवार गटानंतर आता महादेव जानकरांकडून विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी

सदरचा गुन्हा हा १९ एप्रिल २०२३ रोजी अलिबाग शहरातील रामनाथ परिसरात घडला होता. आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला तिच्या घराच्या अंगणातून फुस लावून पळवून नेले. त्यानंतर तिला आपल्या घराच्या समोरील निर्जन पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन अश्लील चाळे केले. विनयभंग करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडित अल्पवयीन मुलीने याबाबत घरच्यांना सांगितल्यानंतर मुलीच्या वडिलांनी आरोपी विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.