प्रतिष्ठित अशा जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सभेत प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षासह इतरांकडून सभासद महिलेचा विनयभंग झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल असूनही संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली नाही. उलट या संशयितांकडून धमकी व दबावतंत्राचा अवलंब करण्यात येत असल्याने पीडित महिलेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे.
पंधरा वर्षांपासून संस्थेच्या सदस्य असलेल्या चिंचोली येथील या महिलेने उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. जिल्ह्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचार व विनयभंगसारख्या गुन्ह्यांविषयी जिल्हा व पोलीस प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे.
१३ एप्रिल २०१३ रोजी संस्थेची सभा झाली. या सभेत उपस्थित असताना मुख्य कार्यालयात प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष एन. डी. करे, दगाजी बच्छाव, विजय पाटील, संजय इप्पर व इतरांनी आपल्याशी अश्लील वर्तन केले. याबाबत आपण पोलिसांकडे तक्रार केली, परंतु त्याचीही दखल घेतली गेली नाही असे या महिलेचे म्हणणे आहे. त्यामुळे न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तातडीने गुन्हा नोंदवून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश २९ एप्रिल रोजी दिले. त्यानुसार करे, बच्छाव व इप्पर आदींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होऊन आठवडय़ापेक्षा अधिक दिवस झाले. परंतु संशयितांना पोलिसांनी अटक केलेली नाही. करे हे शासकीय अधिकारी तर बच्छाव हे उद्योगपती असल्याने पोलीस त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास धजावत नसल्याचा आरोपही या महिलेने केला आहे.

Story img Loader