विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. लोकसभेनंतर या पाच जागांसाठी निवडणूक होत असल्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाशिकचा दौरा करत आपल्या उमेदवाराचा प्रचार केला. त्यानंतर आज नाशिकमध्ये आलेल्या शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
मुख्यमंत्री शिंदे काल नाशिकमध्ये येऊन गेले. ते निवडणुकीत कशासाठी येतात, हे सर्वांनाच माहीत आहे. मला आश्चर्य वाटते, या महाराष्ट्राला शिक्षकांची आणि शिक्षणाची मोठी परंपरा आहे. मुख्यमंत्री नाशिकमध्ये येऊन शिक्षकांना शेअर बाजारप्रमाणे भाव लावत असतील तर या परंपरेला फार मोठा तडा जाताना दिसत आहे. शिक्षक त्यांचा प्रतिनिधी निवडतील. शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका, त्यांना बाजारात उभे करू नका, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.
संजय राऊत पुढे म्हणाले, सुषमा अंधारे यांनी याबाबतचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. तुम्ही या थरापर्यंत खाली येऊ नका. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टरमधून २० कोटी कसे उतरवले, हे सगळ्यांनी पाहिले. पैशांच्या बॅगा तुमचे अंगरक्षक पेलवत होते. पण कृपा करून पदवीधर, शिक्षक या वर्गाला बाजारात ओढू नका, अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली. निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी हा व्यभिचार पाहत आहे. लोकशाहीची हत्या होत आहे. लोकशाहीचे वस्त्रहरण रोखण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे, पण आयोग धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी लावून पाहत बसला. या पट्टीची गाठ मोदी आणि शाह यांनी बांधली आहे.
प्रकरण काय आहे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगावातील सभेनंतर महायुतीच्या नेत्यांकडून शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांना पैसे वाटप करण्यात आले, असा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी हे आरोप केले आहेत. तसेच त्यांनी निवडणूक आयोग कुठं आहे? असा प्रश्नदेखील उपस्थित केला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd