या वर्षी नियोजित वेळेच्या अगोदरच मान्सूनचे आगमन होणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र मान्सूनचे आगमन लांबले. दरम्यान, आज म्हणजेच ११ जून रोजी अखेर मुंबईत मान्सूनचे आगमन झाले आहे. लवकरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “ज्येष्ठ मंत्र्यांची ९ मतं आम्ही संजय पवारांना दिली पण…”, राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान

मागील दोन दिवसांपासून मुंबईमध्ये ढगाळ वातावरण होते. तसेच या काळात मुंबई, कल्याण, ठाणे या भागांमध्ये मान्सूनपूर्व सरी बरसल्या. त्यामुळे लवकरच मुंबईत मान्सूनचे आगमन होणार असल्याचे सांगितले जात असताना आज प्रत्यक्षात मुंबई तसेच उपनगरीय प्रदेश आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. ‘आज 11 जून रोजी डहाणू, मुंबई, ठाणे, रायगड तसेच मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुण्यापर्यंत आणि कर्नाटकातील गदगपर्यंत मान्सूनचे आगमन झाले,’ असे मुंबईच्या हवामान खात्याने सांगितले आहे.

हेही वाचा >>> “फटके खाल्ल्याशिवाय त्यांना शहाणपण शिकता येत नसेल तर…” निवडणुकीतील विजयानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

मराठवाड्यातही ढगाळ वातावरण

मागील काही दिवसांपासून कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगळला होता. मात्र आता नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या पुढील वाटचालीस अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यातही ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यात काळे ढग जमा झाले असून काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. तर काही भागात फक्त ढग जमा झाले असून अद्याप पावसाचे आगमन झालेले नाही.

हेही वाचा >>>“लगानमधील लाखा कोण? मविआनं शोधावं”, राज्यसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसचा सल्ला!

मोसमी पावसाने यंदा सर्वसाधारण वेळेच्या दोन दिवस आधीच म्हणजे २९ मे रोजी केरळमधून भारतात प्रवेश केला होता. या काळात अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प येत असल्याने आठवड्याच्या कालावधीतच महाराष्ट्रात मोसमी पावसाचा प्रवेश होण्याबाबत अंदाज देण्यात आला होता. मात्र, वाऱ्यांचा वेग कमी होऊन मोसमी पावसाच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला होता. ३१ मे रोजी कर्नाटकच्या कारवारपर्यंत आणि गोव्यापासून काही अंतरावर मोसमी पाऊस पोहोचला होता. त्यानंतर त्याची कोणतीही प्रगती झाली नव्हती. अरबी समुद्राच्या बाजूने मोसमी पावसाचा प्रवास गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून थांबलेला होता. मात्र, प्रवासासाठी पोषक वातावरण तयार झाले असून लवकरच मोसमी पावसाचा कोकणातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रवेश होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon arrives in mumbai pune raigad and thane now latest weather forecast prd