राज्यात मान्सूनचे आगमन झालेले असून, परिस्थती अनुकुल असल्याने आगामी ४८ तासांत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र व्यापला जाणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयातील हवामान तज्ज्ञ शुभांगी भुत्ये यांनी ही माहिती दिली आहे.
मान्सूनबाबत माहिती देताना शुभांगी भुत्ये म्हणाल्या, यंदाचा मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे. ११ जून रोजी हा तळ कोकणात व मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये दाखल झालेला आहे. तर, आज १२ जून रोजी हा मान्सून हर्णे, बीड व महाराष्ट्रातील काही भागात दाखल झालेला आहे. येत्या ४८ तासांमध्ये परिस्थिती अनुकुल आहे, त्यामळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हा मान्सून व्यापणार आहे.
आज आलेल्या पावासाच्या नोंदीनुसार संगमनेश्वर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी १४० मिलीमीटर, मालवणला १५८ मिलीमीटर व संगमनेश्वरला ११५ मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे.
तर, मराठवाड्यातील बीड येथे ६२ मिलीमीटर, उदगीरमध्ये ६५ मिलीमीटर तर मुखेडमध्ये ६१ मिलीमीटर पाऊस झालेला आहे. आगामी ४८ तासांत मान्सूने अवघा महाराष्ट्र व्यापलेला असेल असे त्यांनी सांगितले.