महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तीन दिवस आधीच केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर, महाराष्ट्रात देखील वेळेआधीच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. पण वेळ निघून गेल्यानंतरही अद्याप महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं नाही. त्यामुळे हवामान विभाग पुन्हा एकदा तोंडघशी पडलं आहे. यानंतर आता आयएमडीने महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा नवा मुहूर्त काढला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१२ जून रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे. सध्या कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगळला असून नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या पुढील वाटचालीस अडथळे निर्माण होत आहेत. पुढील काही दिवसांत मान्सूनच्या आगमनासाठी महाराष्ट्रात पोषक हवामान तयार होईल, परिणामी १२ जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होईल, अशी नवी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून चुकणारे हवामान अंदाज आणि निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेता, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असं आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. राज्यात किमान ८० ते १०० मिलीमीटर पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, अन्यथा दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं, असंही दादा भुसे यांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्रातील काही भागांत सोसाट्यांच्या वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावली आहे. तर आज मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागात अंशत: ढगाळ हवामान निर्माण झालं आहे. येत्या काही तासांत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon development stopped at goa when monsoon will arrive in maharashtra imd latest update rmm