मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्यातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली होती. त्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती. ते भाकीत खरं ठरताना दिसत आहे. मानसून सक्रीय झाल्याने राज्यात शेतीच्या कामांना वेग आला आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करत महाराष्ट्रात मानसून दाखल झाल्याची माहिती दिली आहे. दक्षिण कोकणात हर्णेपर्यंत आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोलापूरपर्यंत मानसूनची हजेरी लागली आहे. मराठावाड्यातील काही सलग्न भागातही मानसून सक्रीय झाला आहे. ही परिस्थिती पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल आहे. राज्यात सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज असला, तरी मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. खरीप हंगामातील पिकांच्या दृष्टीने पावसाचा अंदाज सकारात्मक आहे.
चांगली बातमी मान्सूनची ..
मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला.
मान्सून रेषा राज्यात, द.कोकणात हर्णे पर्यंत, द.मध्य महाराष्ट्रात सोलापूर पर्यंत, मराठवाडा काही सलग्न भाग…
परीस्थिती पुढच्या वाटचालीसाठी अनुकुल..
IMD pic.twitter.com/L4ZmSbFlrbआणखी वाचा— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 5, 2021
देशात यंदा सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यासंदर्भातलं परिपत्रक हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं असून त्यामध्ये याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पावसाचं प्रमाण कसं ठरवलं जातं?
केंद्रीय हवामान विभागाकडून पावसाचं प्रमाण सामान्य आहे, कमी आहे किंवा जास्त आहे हे ठरवण्याचे काही मापदंड ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज असेल, तर ते प्रमाण कमी मानलं जातं. सरासरीच्या ९० ते ९६ टक्क्यांच्या मध्ये पावसाचा अंदाज असेल, तर ते प्रमाण सामान्यपेक्षा कमी असं मानलं जातं. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्क्यांमध्ये पावसाचा अंदाज असेल, तर ते प्रमाण सामान्य मानलं जातं. हेच प्रमाण १०४ ते ११० टक्क्यांच्या मध्ये असल्यास ते प्रमाण सामान्यहून अधिक तर ११० टक्क्यांपेक्षाही जास्त असल्यास अतिवृष्टी मानली जाते.