कोकण, अलिबाग आणि डोंबिवलीत पाऊस, आजही शक्यता

दक्षिण कोकणामध्ये सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने कोकणात तसेच रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग आणि ठाणे जिल्ह्य़ातील डोंबिवलीमध्ये शनिवारी पाऊस पडला. अवेळी पडलेल्या या सरींमुळे वातावरणातील अनियमितता वाढत चालल्याचे उघड झाले असून पर्यावरण तज्ज्ञ त्याबद्दल चिंता व्यक्त करीत आहेत. रविवारीही चक्राकार वाऱ्यांमुळे कोकण विभागासह मध्य महाराष्ट्रातील काही भागांत दुपारनंतर हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी शनिवारी संध्याकाळनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे रात्रीची थंडी कमी झाली आहे.

गेल्या आठवडय़ापासून उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह राज्याच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागातील किमान तापमानात घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात १७ ते १४ अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान आल्याने रात्री थंडी जाणवत होती. आकाश निरभ्र राहत असल्याने थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता. मात्र, दक्षिण कर्नाटक आणि परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होत असल्याने राज्याच्या दक्षिण भागात शनिवारपासून (३ नोव्हेंबर) पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती. त्यानुसार काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. बहुतांश भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने त्याचप्रमाणे आद्र्रता वाढल्याने किमान तापमानात वाढ होऊन रात्रीची थंडी गायब झाली आहे.

ढगांचे सावट आणि पाऊस

राज्यात अनेक ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या कोकणात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असल्याने दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

अनेक शहरांत पावसाचा अंदाज

स्कायमेट या हवामानविषयक संस्थेनुसार पुणे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि औरंगाबादमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर आणि वाऱ्यांचा जोर मोठा राहील, असा अंदाज आहे. मुंबई आणि परिसरांत काही भागांत  हलका पाऊस होण्याचा अंदाज या संस्थेने वर्तविला आहे.