यंदा देशावर अपुऱ्या पावसाचे सावट असतानाच देशवासीयांसाठी खुशखबर आहे. पावसाच्या आगमनाची वर्दी देणारे मोसमी वारे (मान्सून) शनिवारी, १७ मे रोजीच अंदमानात दाखल होणार आहेत. म्हणजे नेहमीपेक्षा ७२ तास आधीच मोसमी वाऱ्यांनी अंदमान बेटांना स्पर्श केला असेल. पुढच्या प्रवासात अडथळा न आल्यास वेळेआधीच मान्सून केरळात पोहोचण्याची शक्यता आहे.
संपूर्ण भारतीय उपखंडाला व्यापणाऱ्या मान्सूनचे भारतातील आगमन सर्वप्रथम अंदमान-निकोबार बेटांवर होते. त्यानंतर केरळमार्गे त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. सामान्यत २० मे रोजी मान्सून या टापूत पोहोचतो. यंदा मात्र १७ मे रोजीच तो हा टापू गाठेल अशी शक्यता आहे. त्यासाठीची अनुकूल स्थिती निर्माण झाली असून त्या भागात वादळी पाऊस पडत असल्याचे हवामान विभागाच्या उपमहासंचालक डॉ. मेधा खोले यांनी सांगितले.
यंदाच्या पावसावर ‘एल-निनो’ या हवामान घटकाचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. या पाश्र्वभूमीवर मान्सून वेळेआधी अंदमानात दाखल होणे ही आशादायक बाब आहे. मान्सूनचे आगमन वेळेवर झाले, तरी त्याचा पुढचा प्रवास कसा होतो, त्यात काही खंड पडणार का, यावर  शेती व इतर क्षेत्रांचे भवितव्य अवलंबून असेल.