पुणे : दीर्घ विश्रांतीनंतर राज्याच्या बहुतांश भागात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होऊ लागला आहे. पावसाचा हा टप्पा एक आठवडय़ाहून अधिक काळ सक्रिय राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या सर्वच भागात या कालावधीत कमी-अधिक प्रमाणात पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभागांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सध्या मोसमी पावसाला सक्रिय होण्यासाठी पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यानुसार पुढील आठवडाभर राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. राज्याच्या काही भागांत बुधवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी नाशिक, सातारा आदी भागांत जोरदार पाऊस झाला. कोकणातही पावसाची हजेरी होती. विदर्भात तुरळक भागांत पावसाची नोंद झाली.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत ५ किंवा ६ ऑगस्टपासून काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. या कालावधीत मुंबई, ठाणे परिसरातही जोरदार सरींचा अंदाज आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा आदी भागांतही प्रामुख्याने घाट विभागांमध्ये मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आदी जिल्ह्यांत पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ७ ऑगस्टपासून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

सक्रियता कशामुळे?

मोसमी पावसाची आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सरासरी जागेपासून उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याशी सरकल्याने महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली होती. मात्र, ही आस पुन्हा मूळ जागेवर येत आहे. साहजिकच राज्यामध्ये पुन्हा पाऊस सक्रिय होत आहे. मोसमी पावसाची ही प्रणाली अधिकाधिक दक्षिणेकडे सरकणार असल्याने राज्याच्या दक्षिण भागासह दक्षिण भारतातील केरळ तमिळनाडू, कर्नाटकात मोठय़ा पावसाची शक्यता आहे.

साताऱ्यात मुसळधार

वाई : सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी मुसळधार पावसाने सातारा शहर आणि परिसराला झोडपून काढले. या पावसाने उड्डाणपूल, महामार्गावर पाणी जमा झाल्याने वाहतूक विस्कळित झाली तर शेतातही मोठय़ा प्रमाणात पाणी जमा झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. सातारा, वाई परिसरात गेले दोन दिवस जोरदार पाऊस पडत आहे. दिवसभर उष्म्यानंतर दुपारीनंतर मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे. गुरुवारी दुपारीनंतरही सातारा वाई शहर, तालुका व महामार्ग परिसरात मुसळधार पाऊस झाला. पुणे -बेंगळुरू महामार्गावरील सातारा, वेळे, सुरुर, कवठे, भुईंज आदी परिसरातही पावासाचा जोर मोठा होता. या पावसाने महामार्गावरील व सातारा शहर हद्दीतील वाढेफाटा उड्डाणपुलावर एक फुटापेक्षा जास्त पाणी साठून राहिले. महामार्गावरही  वाहतूक विस्कळीत झाली होती. 

वीज पडून महिला ठार

नागपूर : विदर्भात पावसाचे पुनरागमन झाले असून विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे नागपूर-अमरावती मार्गावरील बाजारगाव येथे एका घरावर वीज पडून महिलेचा मृत्यू झाला. तर खापरखेडा, वलनी गाव येथे मंदिराजवळील झाडांवर वीज पडल्याने दहा माकडांचा जागीच मृत्यू झाला. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात गुरुवारी पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवली. त्यानंतर पावसाने आठ दिवस उसंत घेतली असतानाच गुरुवारी दुपारच्या सुमारास ढगांचा जोरदार गडगडाट झाला. त्याचवेळी विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार पुनरागमन केले. यवतमाळ येथेही विजांच्या कडकडाटासह तब्बल अर्धा तास पावसाने हजेरी लावली.  इतर जिल्ह्यात मात्र रिमझिम पाऊस होता. आंतरराष्ट्रीय हवामान केंद्राने पुढील आठवडय़ात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

Story img Loader