पुणे : नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आनंदघन अखेर रविवारी केरळमार्गे भारतात दाखल झाले. अरबी समुद्र आणि केरळमधील हवामानाचे आडाखे लक्षात घेऊन भारतीय हवामानशास्त्र विभागाने रविवारी मोसमी पावसाचा प्रवेश जाहीर केला. सर्वसाधारण वेळेपेक्षा तीन दिवस आधीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला असून, आता त्याच्या महाराष्ट्रातील आगमनाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
यंदा मोसमी पावसाचा अंदमानातील प्रवेश सर्वसाधारण तारखेपेक्षा सहा दिवस आधीच १६ मे रोजी झाला होता. सुरुवातीला मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीचा वेग चांगला होता. मात्र, त्यानंतर दिवसाआड त्यांचा प्रवास सुरू झाला. बंगालच्या उपसागरात प्रगती होत असताना अरबी समु्द्रातील प्रगती रखडली होती. २० मे रोजी दक्षिण अरबी समुद्रात मोसमी पावसाचा प्रवेश झाला. त्यामुळे केरळमधील प्रवेशाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. तीन दिवसांपूर्वी मोसमी वाऱ्यांना आगेकूच करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे दोन-तीन दिवसांत मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. समुद्रसपाटीपासून केरळच्या दिशेने वेगाने वाहणारे वारे, अरबी समुद्र आणि केरळमध्ये मोठय़ा प्रमाणावर जमा झालेले ढग आणि गेल्या चोवीस तासांमध्ये केरळमधील १४ हवामान केंद्रांच्या विभागांत झालेला मोठा पाऊस, या हवामानविषयक बाबी लक्षात घेऊन मोसमी पावसाचा केरळमधील प्रवेश जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील प्रवेश कधी?
मोसमी पावसाच्या केरळ प्रवेशानंतर आता त्याच्या महाराष्ट्रातील प्रवेशाचे वेध लागले आहेत. मोसमी पावसाच्या महाराष्ट्रातील प्रवेशाची सर्वसाधारण तारीख ७ जून आहे. २०२० मध्ये केरळमध्ये सर्वसाधारण तारखेलाच म्हणजे १ जूनला त्याचा प्रवेश झाला होता. मात्र, महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी त्याने दहा दिवसांचा कालावधी घेत ११ जून ही तारीख गाठली होती. २०२१ मध्ये ३ जूनला केरळमध्ये दाखल झाल्यानंतर द्रुतगतीने प्रवास करीत अवघ्या दोनच दिवसांत ३ जूनला तो महाराष्ट्रात आला होता. यंदा सर्वसाधारण तारखेपेक्षा तीन दिवस आधी केरळात दाखल झाला असताना तो महाराष्ट्रात कधी पोहोचणार, याबाबत उत्सुकता आहे.
२०१० पासून चौथ्यांदा वेळेआधी दाखल मोसमी पाऊस २०१० पासून यंदा चौथ्यांदा सर्वसाधारण वेळेआधीच (१ जून) केरळमध्ये दाखल झाला आहे. यापूर्वी २०१० मध्ये ३१ मे, २०१७ मध्ये ३० मे, २०१८ मध्ये २९ मे रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये पोहोचला होता. २००६ मध्येही तो वेळेआधी २६ मे रोजी केरळात पोहोचला होता. २०१३, २०२० मध्ये तो १ जूनलाच केरळमध्ये पोहोचला होता. २०१९ आणि २०१६ (८ जून), २०१५ (५ जून), २०१४ (६ जून) या वर्षांत त्याला केरळ प्रवेश करण्यासाठी विलंब झाला होता.
आजपासून पाऊस
मोसमी वाऱ्यांचा प्रवास सुरू असताना राज्याच्या प्रामुख्याने दक्षिण भागामध्ये ३० मेपासून काही भागांत मेघगर्जना आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य-पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाडय़ातील परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.