पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी झाल्याने सत्ताधाऱ्यांसमोरील विरोधकांचं आव्हान गळून पडलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेतेच सत्तेत सहभागी झाल्याने यंदाचे पावसाळी अधिवेशन विरोधकांच्या आक्रमतेशिवाय होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शरद पवार गटाकडे १० ते १५ आमदार, ठाकरे गटाकडे १५ आणि काँग्रेसच्या ४५ आमदारांचं संख्याबळ असलं तरीही सत्ताधाऱ्यांना नमवण्यासाठी विरोधकांची दमछाक होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
“सध्या जे काही घडलं आहे त्या पार्श्वभूमीवर सर्वच विषय आज चर्चेत घेतले जातील”, असं अशोक चव्हाण म्हणाले. पावसाळी अधिवेशन उद्यापासून (१७ जुलै) सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांची आज बैठक होणार आहे. या बैठकीबाबत अशोक चव्हाणांनी ही प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा >> “अजित पवारांनी त्यांचा पक्ष वाढवला, यात गैर काय?” निधीवाटपावरून संजय शिरसाटांचा रोखठोक प्रश्न
ते पुढे म्हणाले की, “जेवढे आता आहेत ती सर्व मंडळी प्रामाणिकपणे काम करतील. जे व्हायचं आहे ते होऊन गेले आहे. ठाकरे गट आणि शरद पवारसाहेबांसोबत जे आमदार आहेत आणि काँग्रेसचे ४५ आमदार एकत्र मिळून प्रभावी विरोधी पक्ष म्हणून सभागृहात आक्रमक होऊन काम करणार आहोत”, असं अशोक चव्हाण म्हणाले.
हेही वाचा >> “संपूर्ण विश्वाला चिंता, पण विश्वगुरू…”, संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
विरोधी पक्षावर दावा करणार का?
विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची रिकामी आहे. तात्पुरती ही खुर्ची जितेंद्र आव्हाडांकडे दिली असली तरीही सभागृहातील शरद पवारांचे संख्याबळ पाहता ही खुर्ची केव्हाही जाऊ शकते. यावर काँग्रेसने दावा केला आहे. सभागृहात सर्वाधिक संख्याबळ आता काँग्रेसचे असल्याने विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. त्यावर अशोक चव्हाण म्हणाले की, “सर्वाधिक संख्या बळ असलेल्या एका पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं अशी प्रथा आहे. परंतु, यावर अद्यापही काही चर्चा नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो पाळला जाईल.”