ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे विदर्भात मान्सूनच्या सर्वाधिक काळ मुक्कामाचा विक्रम नोंदल्या जाण्याची शक्यता आहे. विदर्भात ६ जूनला मान्सूनचे आगमन झाले होते. मान्सूनचा विदर्भातील मुक्काम ३० सप्टेंबपर्यंत राहतो. यंदाचा मान्सून मात्र त्याला अपवाद ठरला आहे. गेल्या १२४ दिवसांपासून मान्सून अत्यंत सक्रिय असून गेल्या आठवडाभरात परतीच्या पावसाने विदर्भाला पुन्हा तडाखा दिला आहे.
हवामान खात्याच्या वरिष्ठ सूत्रांशी संपर्क साधला असता, ३० सप्टेंबपर्यंतच्या काळातील पाऊस सामान्य मान्सून म्हणून मोजला जातो. परंतु, पावसाचे रंग दाखवणे सुरू असल्याने मान्सून केव्हा परतेल, याचे कोणतेही भाकित करणे अशक्य आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या आठवडाभरापासून विदर्भात पाऊस पडू लागला आहे. ही स्थिती आणखी पाच-सहा दिवस कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित २० ते २२ ऑक्टोबपर्यंत पावसाळ्याचा काळ राहील, असा अंदाज आहे. हवामान खात्याच्या भाकितानुसार पाऊस कायम राहिला तर मान्सूनच्या सर्वाधिक काळ मुक्कामाचा नवा विक्रम विदर्भात नोंदला जाणार आहे.
यावर्षी मान्सूनच्या परतीचा काळ सांगणे अवघड आहे. एका जाणकाराने दिलेल्या माहितीनुसार १९७६ साली विदर्भात मान्सून दिवाळीपर्यंत लाबला होता. यंदा अशीच शक्यता दिसून येत आहे. असे घडल्यास यंदाचा मान्सून सर्वाधिक मुक्कामाचा राहणार आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात १ ते ५ दिवस अधिक पाऊस झाला होता. २००२ ते २०१२ यादरम्यानच्या नोंदीवर नजर टाकल्यास ऑक्टोबर महिन्यात जास्तीत जास्त १ ते ३ दिवस पाऊस झालेला आहे. यंदाची परिस्थिती वेगळी आहे. कारण, ७ ऑक्टोबपर्यंत विदर्भात कुठे ना कुठे पाऊस पडला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार १९८५ साली सर्वाधिक ३६३.१ मिमी पाऊस पडला होता. यात १२ ऑक्टोबर १९८५ या दिवशी तब्बल १७२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. जर मान्सूनचे ढग टिकून राहिले तर चालू ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक पावसाचा विक्रमही मोडला जाण्याची चिन्हे आहेत. नागपुरात साधारणत: पावसाळ्याच्या मोसमात ११२ सेमी पाऊस पडतो. परंतु, यावर्षी ७ ऑक्टोबपर्यंत १६२.५९ सेमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सून अजूनही सक्रिय असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्य़ात येत्या ४८ तासात दणक्यात पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात मान्सूनच्या मुक्कामाचा नवा विक्रम नोंदला जाण्याची चिन्हे
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे विदर्भात मान्सूनच्या सर्वाधिक काळ मुक्कामाचा विक्रम नोंदल्या जाण्याची शक्यता आहे. विदर्भात ६ जूनला मान्सूनचे आगमन झाले होते.
First published on: 08-10-2013 at 02:03 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon set to be create new record in vidarbha