नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून शनिवारी सकाळी केरळात दाखल झाला असून, त्याने संपूर्ण केरळ राज्य तसेच, तामिळनाडू व कर्नाटक राज्यांचा काही भागही व्यापला. येत्या सोमवार सकाळपर्यंत तो आणखी पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे. आताची स्थिती पाहता तो महाराष्ट्रात वेळापत्रकानुसार म्हणजे ५-६ जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर मान्सूनची प्रतीक्षा केली जात होती. त्याची सुरुवात तरी वेळेवर झाली आहे. मान्सूनची केरळात पोहोचण्याची सरासरी तारीख १ जून आहे. त्याच्या जवळपास तो केरळात पोहोचतो. या वर्षी त्याने नेमकेपणाने ही तारीख पाळली. केरळात गेले दोन दिवस जोरदार पाऊस सुरू आहे. मान्सूनचे आगमन जाहीर करण्यासाठी हवामानाचे आवश्यक ते निकष पूर्ण केल्यामुळे शनिवारी ते जाहीर करण्यात आले. मान्सून शुक्रवारीच श्रीलंकेत दाखल झाला होता. पाठोपाठ तो केरळातही पोहोचला. सध्या त्याने केरळ पार करून कर्नाटक व तामिळनाडूपर्यंतचे अंतर कापले आहे. त्याची उत्तर सीमा मंगळुरू, म्हैसूर, सेलम, कडलोर या शहरातून जात असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. पुढील दोन दिवस तरी तो पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती आहे. सोमवार सकाळपर्यंत तो संपूर्ण तामिळनाडू राज्य व्यापेल. मध्य अरबी समुद्र व कर्नाटकमध्ये आणखी पुढे सरकेल. त्याचबरोबर आंध्र प्रदेशातही प्रवेश करेल, असा अंदाजही हवामान विभागातर्फे जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, दक्षिण भारतात अनेक ठिकाणी  वादळी पावसाने हजेरी लावली. त्यात गोवा, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, केरळ या राज्यांचा, तर लक्षद्वीप बेटांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रातही वेळेवर
‘‘मान्सूनला पुढे सरकण्यासाठी आता अतिशय अनुकूल स्थिती आहे. त्यात पुढील काही दिवसांत तरी अडथळे येण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्याचे महाराष्ट्रातील आगमन सरासरी वेळेवर म्हणजे ५-६ जून रोजी होण्याची शक्यता आहे,’’ असे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालक डॉ. मेधा खोले यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon sets in over kerala