गेल्या तीन महिन्यांपासून जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाच्या काहिलीमुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांसाठी हवामान विभागानं आनंदाची बातमी जाहीर केली आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं अर्थात मान्सूनचं अंदमानमध्ये अर्थात बंगालच्या उपसागरात १६ मे रोजीच आगमन झालं आहे. याशिवाय केरळमध्ये येत्या १७ मे रोजीच पावसाचं झोकात आगमन होणार असल्याचं देखील हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यातील खरीप हंगामापूर्वी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये भारतीय हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेनं वाट पाहात आहे, त्या मान्सूनचं महाराष्ट्रात नेमकं कधी आगमन होणार आहे, याविषयी देखील होसाळीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
या बैठकीमध्ये राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला. या हंगामासाठी आवश्यक असणारा पाऊस यंदा होईल की नाही, याविषयी होसाळीकर यांच्याकडे विचारणा केली असता संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज होसाळीकर यांनी या बैठकीत व्यक्त केला आहे.
होसाळीकर यांनी बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, येत्या ५ जून रोजी महाराष्ट्रात तळ कोकणात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. अंदमानमध्ये १६ मे रोजी दाखल झालेल्या मान्सूनचं केरळमध्ये २७ मे रोजी आगमन होण्याचा देखील अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मराठवाड्यात जास्त पाऊस
दरम्यान, होसाळीकर यांनी आढावा बैठकीत दिलेल्या माहितीनुसार यंदा मराठवाड्यामध्ये सामान्यपेक्षा जास्त अर्थात Above Normal पाऊस होण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता एकूणच समाधानकारक पाऊस राहण्याची शक्यता आहे. देशात ला नीनाची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.