शनिवारी (११ जून) मुंबईसह दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांत मान्सूनचं आगमन झालं आहे. काल दिवसभरात मुंबई, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहे. आज मान्सूनच्या रेषेत कोणताही बदल झाला नाही. मात्र, मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी महाराष्ट्रासह आसपासच्या प्रदेशात पोषक हवामान तयार झालं आहे. येत्या चोवीस तासात मराठवाड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, आज मान्सून रेषेत कोणताही बदल झाला नाही. पण उत्तर अरबी समुद्र, कोकणातील उर्वरित भाग, गुजरातमधील काही भाग, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी भाग, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बंगालचा उपसागर परिसरात मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. मराठवाड्यात देखील मान्सूनच्या आगमनासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. येत्या चोवीस तासात याठिकाणी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने आज दक्षिण मराठवाड्यातील काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील दोन ते तीन तासांत ठाणे, रायगड, औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यात वादळी वारे वाहण्याची शक्यता असून वाऱ्यांचा वेग ४० ते ५० किमी प्रतितास इतका राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
मराठवाड्यात इतर ठिकाणी ढगाळ हवामान
मागील काही दिवसांपासून कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगळला होता. मात्र आता नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या पुढील वाटचालीस अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत. तर काही भागात फक्त ढग जमा झाले आहेत. पण अद्याप मराठवाड्यात मान्सून दाखल झाला नाही.