राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी काल (२२ जानेवारी) नाशिक दौरा केला. नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन त्यांनी रामाचं दर्शन घेतलं. त्यानंतर आज (२३ जानेवारी) त्यांनी नाशिकमध्ये शिवसेना (ठाकरे गट) राज्यव्यापी अधिवेशन घेतलं. या अधिवेशातून त्यांनी भाजपावर तुफान टीका केली. तसंच, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा संदर्भ देत तत्कालीन जनसंघ पक्षालाही लक्ष्य केले.
“जे म्हणतात आम्ही हिंदुत्त्व सोडलं, त्यांना सांगायचं आहे की तुम्ही तुमचा जनसंघ पक्ष घुसेल तिथे घुसवला. भारतीय जनता पक्ष पूर्वी जनसंघ पक्ष होता. जनसंघ पक्ष संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात उतरला नाही . संयुक्त महाराष्ट्राच्या समितीत ते जागेसाठी उतरले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून महाराष्ट्रात जे काहूर उठलं होतं म्हणजे अक्षरशः लालबाग-परळ भाग पेटला होता. मोरारजींचे पोलीस चाळींवर अश्रूधुरांच्या नळकांड्या मारत होते. घरांच्या आतपर्यंत अश्रूधुंरांचे नळकांड्या पोहोचायचे. त्यामुळे महिला आणि त्यांची तान्ही पोरं घुसमटायची. असह्य झाल्यावर तेव्हा महिला काँग्रेसमध्ये गेल्या नव्हत्या. महिला पोलिसांसमोर उभ्या राहिल्या. असेल हिंमत तर समोरा-समोर गोळ्या झाडा, पण नामर्दाचं काम करू नका, असं म्हणायच्या. त्या लढ्यात तेव्हा भारतीय जनता पक्ष नव्हताच, पण जनसंघ पक्षही नव्हता”, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
हेही वाचा >> “आपली शिवसेना पळवणाऱ्या वालीचा राजकीय वध..”, उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंविरोधात आक्रमक
शामाप्रसाद मुखर्जींबद्दलही बोला
“संयुक्त महाराष्ट्राची समिती जनसंघाने जागावाटपाच्या भांडणात फोडली. त्या आधीचा जनसंघ आहे तो शामाप्रसाद मुखर्जींनी स्थापन केला. शामाप्रसाद मुखर्जींबद्दल आदर आहे. पण १९४०-४२ चा काळ होता चले-जाव आंदोलनाचा. शामाप्रसाद मुखर्जी बंगालमध्ये होते. १९४० च्या सुमारास देशातील मुस्लीम लीगने स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव केला. स्वातंत्र्यलढ्यात RSS आणि जनसंघ लढ्यात भाग घेतला नाही. आयतं मिळालेलं स्वातंत्र्य हे गिळायला निघाले. स्वातंत्र्यासाठी काँग्रेस लढत होते. स्वातंत्र्यलढ्यात लढणारी काँग्रेस नको म्हणून स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव करणाऱ्या मुस्लीम लीगबरोबर शामाप्रसाद मुखर्जींनी बंगालमध्ये सत्ता स्थापन केली. ११ महिने त्या मंत्रिमंडळात शामाप्रसाद मुखर्जी म्हणजेच राजकारणातील तुमचा बाप सामील होता, त्याबद्दलही तुम्ही बोला”, असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिलं.