गुजरातमध्ये जैन मुनींवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी सकल जैन समाजाच्या वतीने येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर संस्कृती रक्षण मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
गुजरात मधील गिरणार पर्वतावर मुनीश्री प्रबलसागर महाराज यांच्यावर एक जानेवारी रोजी हल्ला झाला. या घटनेपाठोफाठ अहमदाबादजवळ हस्तगिरीजी म.सा. आणि ज्ञानेश्वरजी म.सा या दोन मुनींचा संशयास्पद मृत्यू झाला. तीन वर्षांत अशा प्रकारे जैन धर्मगुरूंसंदर्भात अनेक घटना घडल्या. त्यामुळे जैन समाजात तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. जैन गुरू महाराजांच्या सुरक्षिततेविषयी तसेच संरक्षणाविषयी ठोस कारवाई करण्यात यावी, अपघातास जबाबदार असणारे व प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. गिरणार सिध्दक्षेत्रावर जैन मुनींना संरक्षण देण्यात यावे, तेथे जाणाऱ्या जैन श्रावकांना दर्शनासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, राजस्थानमध्ये पुरातन मूर्तीच्या तोडफोडीची चौकशी करून आरोपींना कडक शासन करावे, या मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
या वेळी आ. जयप्रकाश छाजेड, जैन सेवा संघाचे अध्यक्ष जयेश शहा यांसह जे. सी. भंडारी, सुभाष लोढा, सुरेश शहा, पवन पटणी, नेमिचंद राका, विजय लोहाडे, सचिन शहा, अभय बोरा, अनिल नहार, ललित मोदी आदींसह जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघ, श्वेतांबर मूर्ती पूजक संघ, श्री दिगंबर जैन समाज यांचे विविध पदाधिकारी सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा