शहरास पाणीपुरवठा होणाऱ्या दोन स्रोतांपैकी घाणेवाडी तलाव कोरडा पडलेला, शहागड योजनेच्या दुसऱ्या स्रोतातून महिन्यातून एकदाच आणि तेही ६० टक्के भागात येणारे पाणी, यामुळे जालना शहरातील जनता मेटाकुटीस आली आहे. त्यातच शहरातील जवळपास ८० टक्के विंधण विहिरींना पाणीच शिल्लक नसल्याने जनतेचे पाण्यासाठी होणारे हाल दिवसेंदिवस वाढत आहेत. सुमारे पाच हजारांहून अधिक विंधण विहिरी कोरडय़ा पडल्या आहेत.
गेली अनेक वर्षे तीन लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येचे हे शहर विंधण विहिरी आणि हातपंपावर अवलंबून आहे. या वर्षी जालना जिल्हय़ात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत निम्माही पाऊस झाला नाही. शहरातील मोतीबाग, अमृतेश्वर आणि घाणेवाडी हे तिन्ही तलाव भरले नाहीत. कमी पावसामुळे विंधण विहिरींनाही पाणी राहिले नाही. नगरपालिकेने जिल्हा प्रशासनास दिलेल्या माहितीनुसार शहरात ३ हजार ४०० विंधण विहिरी असून त्यापैकी १ हजार ४०० नगरपालिकेच्या आहेत. परंतु काही आजी-माजी नगर परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांच्या मते हा आकडा चुकीचा आहे. मात्र, खासगी विंधण विहिरी पाच हजारांहून अधिक आहेत. नगरपालिकेच्या १ हजार ४०० आणि खासगी ५ हजार अशा एकूण साडेसहा हजार विंधण विहिरींपैकी ८० टक्के कोरडय़ा पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर खासगीरीत्या पाणी विकत घ्यावे लागते.
संजयनगर भागातील ‘सिटू’ कार्यालयाच्या परिसरातील हातपंप दीड-दोन महिन्यांपूर्वी कोरडा पडला. रेल्वेस्थानक परिसरातील नरिमननगरसारख्या भागात हातपंपांना पाणी नाही. त्या भागातील रहिवासी अण्णा सावंत सांगत होते की, त्यांच्या घरातील विंधण विहिरीस १२ तासांत १० मिनिटे पाणी येते. त्यांच्यासह आणखी एका ठिकाणी तरी एवढे पाणी येते. बाकीच्या खासगी विंधण विहिरी कोरडय़ा पडलेल्या आहेत. जुना जालना भागातील कचेरी रोडवरील बालाजी मंदिरातील विंधण विहिरीस पूर्वी पाणी असायचे. आता तेथे २४ तासांत साधारणत: ५०० लिटर पाणी येते.
अनेक वर्षे नगर परिषद सदस्य आणि उपाध्यक्षपदी राहिलेले विलास नाईक सांगत होते की, विंधण विहिरी कोरडय़ा पडल्याचे प्रमाण यापूर्वी एवढे कधीच नव्हते. मोतीबाग तलावाजवळ असलेल्या योगेश्वरी कॉलनीतील हातपंपांना पाणी नाही, असे यापूर्वी घडले नव्हते. परंतु या उन्हाळय़ात तेथील हातपंप कोरडे पडले आहेत. भाग्यनगर, संजोगनगर, इन्कम टॅक्स कॉलनी, डबल जीन, कसबा, कचेरी रोड इत्यादी भागांत म्हणजे सर्व जुना जालना भागातील हातपंप कोरडे पडलेले आहेत. शहराच्या आसपासच्या शेतातील विंधण विहिरींनाही पाणी राहिलेले नाही. नवीन जालना भागातही अशीच अवस्था असून बडी सडक किंवा अन्य ठिकाणीही हातपंपांना पाणी राहिलेले नाही. स्वयंवर मंगल कार्यालयाजवळ शहागड पाणीपुरवठा योजनेचा जलकुंभ असून त्यात जेव्हा केव्हा पाणी भरले जाते तेव्हा खालच्या व्हॉल्व्हमधून झिरपणारे पाणी घेण्यासाठी दिवसाच नव्हे तर मध्यरात्रीही महिला आणि पुरुषांची गर्दी होते.
जेथे थोडे पाणी आहे ते हातपंप त्या भागातील रहिवासी वर्गणी गोळा करून दुरुस्त करवून घेत आहेत, परंतु याबाबतही नागरिकांना नगरपालिकेचा वेगळाच अनुभव येत आहे. जुना जालना भागातील कसबा परिसरातील रहिवाशांनी नगरपालिकेच्या कारभारास कंटाळून आपसात वर्गणी काढली आणि तेथील हातपंप दुरुस्त करवून घेतला, परंतु त्यानंतर नगरपालिकेचा पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी तेथे पोहोचला आणि परवानगीशिवाय हातपंप दुरुस्त का केला म्हणून जाब विचारू लागला. नगरपालिकेच्या मालमत्तेची दुरुस्ती तुम्ही कशा काय केली? दुरुस्तीच्या वेळी निघालेले जुने पाइप किती होते याचा हिशेब द्या, इत्यादी प्रश्नांना या नागरिकांना सामोरे जावे लागेल, असा अनुभव नाईक यांनी सांगितला.
जालना शहरातील पाच हजारांवर विंधण विहिरी कोरडय़ा!
शहरास पाणीपुरवठा होणाऱ्या दोन स्रोतांपैकी घाणेवाडी तलाव कोरडा पडलेला, शहागड योजनेच्या दुसऱ्या स्रोतातून महिन्यातून एकदाच आणि तेही ६० टक्के भागात येणारे पाणी, यामुळे जालना शहरातील जनता मेटाकुटीस आली आहे. त्यातच शहरातील जवळपास ८० टक्के विंधण विहिरींना पाणीच शिल्लक नसल्याने जनतेचे पाण्यासाठी होणारे हाल दिवसेंदिवस वाढत आहेत.

First published on: 30-03-2013 at 01:12 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More 5000 boring water wall are dry in jalna city