आगामी कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारच्या कुंभमेळा आराखडा समितीकडून अधिकाधिक निधी मंजूर करून घेण्यासाठी पालकमंत्री या नात्याने आपण बांधील असल्याचे आश्वासन छगन भुजबळ यांनी नाशिक महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाला दिले.
महापौर अॅड. यतीन वाघ यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी येथे पालकमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी खा. समीर भुजबळ, आ. उत्तमराव ढिकले, उपमहापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे, सभागृह नेते शशिकांत जाधव आदी उपस्थित होते.
यंदाचा सिंहस्थ कुंभमेळा २०१५-१६ या वर्षांत येत आहे. यासाठी लागणाऱ्या नागरी सुविधा, तपोवनातील साधुग्राम, वाहतूक नियम, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, आरोग्य सेवा यासाठी महापालिकेने २८ ऑगस्ट २०१२ रोजी सिंहस्थ कुंभमेळा कृती आराखडा तयार केला आहे. ही कामे कुंभमेळ्यापूर्वी पूर्णत्वास येण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. मनपाचे उत्पन्न आणि खर्च यांचा हिशेब पाहता विकास कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण आवश्यक ते सहकार्य करावे, असे महापौर यतीन वाघ यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच मनपा क्षेत्रातील नागरी विकासासाठी महापालिकेस आरक्षित जमीन संपादनासाठीही मोठय़ा प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. पुरेसा निधी वेळेवर उपलब्ध न झाल्यास आरक्षणे ताब्यात घेणे शक्य होणार नाही यासाठीही शासनाकडून भरीव निधी मिळावा असे निवेदनात म्हटले आहे.
या वेळी पालकमंत्री भुजबळ यांनी कुंभमेळा आराखडय़ाला मान्यता देण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे असून या समितीतील सर्व विभागांच्या मंत्र्यांकडून जास्तीतजास्त निधी नाशिकसाठी मिळेल यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. खा. समीर भुजबळ यांच्या माध्यमातून केंद्राकडून अधिकाधिक निधी यंदाच्या कुंभमेळ्यासाठी मिळवू, असेही त्यांनी सांगितले. विशेषत: कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर शहरात येणाऱ्या भाविकांच्या सोयींसाठी महापालिकेने गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी महापालिका पदाधिकाऱ्यांना या वेळी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा