गेल्या सव्वा दोन महिन्यात अपवाद वगळता सलग कोसळलेल्या पावसाने रात्रीचा जोर तर दिवसाची ओढ अशी तऱ्हा दाखवत नवे उच्चांक प्रस्थापित केले. कोयना जलाशयात गतवर्षी आजमितीला ७२.४१ टीएसमी पाण्याची आवक झाली होती. यंदा मात्र, याच्या जवळपास ९२.५२ टक्के म्हणजेच सुमारे ६७ टीएमसी पाण्याचा धरणातून विसर्ग करण्यात आला आहे. गतवर्षी आजमितीला ८५ टक्के भरलेले कोयना धरण यंदा सुरुवातीच्या ४० दिवसांपासून शिगोशिग भरून वाहिले आहे. १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या महाकाय कोयना जलाशयात केवळ ६७ दिवसात दररोज प्रतिदिनी २ टीएमसीच्या सरासरीने १३५ टीएमसी पाणी येत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत कोयना धरणात जवळपास दुप्पट पाण्याची आवक झाली असून, पहिल्या सत्रातील एकंदर भरघोस पाऊस समाधानकारक असल्याचे मानले जात आहे. गतवर्षी परतीच्या पावसाने हंगामाच्या सांगतेला म्हणजेच तब्बल सव्वाशे दिवसांनी कोयना धरण कसेबसे क्षमतेने भरले होते. यंदा मात्र, पहिल्या सत्रातील ४० दिवसांतच धरणातून पाणी सोडणे अपरिहार्य बनले.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील जोमदार पावसामुळे कोयना धरणाचे दरवाजे आज सकाळी १० वाजता २ फुटांवरून ४ फुटांपर्यंत उचलून कोयना नदीपात्रात पायथा वीजगृहासह २९,४७७ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, सुमारे २५,८४२ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणाची पाणीपातळी संथगतीने कमी होत असून, उर्वरित पावसाळा व धरणातील उपलब्ध पाणीसाठा विचाराधीन घेऊन संभाव्य पूर व महापुराचे संकट टाळण्यासाठी धरणातून आत्ताच पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी देताना, यंदा यापुढेही संततधार पर्जन्यवृष्टी झाल्यास पुराचा धोका टाळण्यात यश येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
कोयना धरणाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख १२ प्रकल्प शिगोशिग भरून वाहत असून, या प्रकल्पातील पाणीसाठा ९४ टक्क्यांवर असल्याची आकडेवारी आहे. दिवसभरात कोयना धरणाची पाणीपातळी २ इंचाने घटून २,१५८ फुट ५ इंच असून, पाणीसाठा ९८.६७ टीएमसी म्हणजेच ९३.७५ टक्के आहे.
दरम्यान, कोयना धरणामध्ये गेल्या ६७ दिवसांत धरणाच्या १०५.२५ टीएमसी क्षमतेपेक्षा जादा अशा १३५ टीएमसी म्हणजेच १२८.२७ टक्के पाण्याची आवक झाली आहे. पैकी धरणाच्या ६ वक्र दरवाजातून पायथा वीजगृहासह ६७ दिवसांत ६७ टीएमसी पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यातील ५६ टीएमसी पाणी दरवाजातून सोडण्यात आले. हे पाणी विनावापर वाहून गेले आहे. पायथा वीजगृहासाठी पश्चिमेकडे वीजनिर्मितीसाठी सुमारे ११ टीएमसी पाणी उपयोगात आले आहे. सध्या कृष्णा, कोयना नद्या दुथडी वाहत असून, मात्र तुर्तास तरी पूर अथवा महापुराचा धोका संभवत नसल्याचे पाटबंधारे खात्याने स्पष्ट केले आहे.
१३ ऑगस्टपर्यंत कोयना धरण क्षेत्रातील कोयनानगर विभागात ६४ एकूण ४,७५०, महाबळेश्वर विभागात ७१ एकूण ५,१०९, प्रतापगड ७७ एकूण ४,३७५ तर नवजा विभागात सर्वाधिक ९२ एकूण ५,६१२ मिलीमीटर पावसाची नोंद आहे. हा सरासरी पाऊस ४,९६१.५ मि. मी. असून, तो आजवरच्या सरासरीत सुमारे २५ टक्क्याने जादा आहे. गतवर्षी एकूणच संपूर्ण हंगामात परतीच्या पावसासह ४७७६.३३ मि. मी. पावसाची नोंद असून, त्यापेक्षा आजअखेरचा पाऊस सुमारे ५ टक्क्याने अधिक म्हणजेच १८५.१७ मिलीमीटर जादा आहे.
कोयना धरणक्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत यंदा जादा पाऊस
गेल्या सव्वा दोन महिन्यात अपवाद वगळता सलग कोसळलेल्या पावसाने रात्रीचा जोर तर दिवसाची ओढ अशी तऱ्हा दाखवत नवे उच्चांक प्रस्थापित केले.
First published on: 16-08-2013 at 03:44 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More rain in koyna dam area compared to the last year