छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी जालन्यामध्ये मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले असताना पुढाऱ्यांना गावबंदीचे लोण मराठवाडय़ातील अनेक जिल्ह्यांत पसरले आहे. जालन्यातील सुमारे १५० गावांनी गावबंदीची घोषणा केली असून, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील प्रत्येकी सुमारे १०० गावांनीही गावबंदीचे फलक झळकविले आहेत.
हेही वाचा >>> सोलापुरात मराठा आरक्षणासाठी दोनशे गावांत राजकीय नेत्यांना बंदी; साखळी उपोषण सुरू
जरांगे यांनी बुधवारी उपोषणाला प्रारंभ करण्यापूर्वीच त्यांच्या समर्थनार्थ मराठवाडय़ातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांचे अनुयायी एकवटले होते. हिंगोली जिल्ह्यातील १०० गावांनी पुढाऱ्यांना बंदी घातली आहे. नांदेड जिल्ह्यात शंभराहून अधिक गावांनी राजकीय नेते व लोकप्रतिनिधींसाठी गावबंदी लागू केली असून काही प्रमुख गावांमध्ये आरक्षण समर्थकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे मराठेतर सरपंच असलेल्या गावांनीही आरक्षणाची मागणी उचलून धरत गावबंदी जाहीर केल्याचा दावा केला जात आहे. दसऱ्याच्या दिवशी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अर्धापूर तालुक्यातील त्यांच्या आपल्या साखर कारखान्यामध्ये सुरू असलेल्या भाषणादरम्यान घोषणाबाजी झाली. काही ग्रामपंचायतींनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठराव जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांकडे पाठविले आहेत. धाराशिव जिल्ह्यात शंभर गावांनी गावबंदी जाहीर केली असून सर्वाधिक ४० गावे एकटय़ा परंडा तालुक्यात आहेत.
शिंदे-फडणवीसांची अमित शहांशी चर्चा
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी नवी दिल्लीला दाखल झाले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करून मराठा आरक्षण देता येईल का, याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे समजते. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये येणार असून त्यावेळी ते शिंदे, फडणवीस त्यांच्याशीही चर्चा करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, शिंदे आणि फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, ‘ते मला विचारून दिल्लीला गेलेले नाहीत’ असे उत्तर त्यांनी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.