रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. माती परीक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले होते. त्यामुळे येथील परिस्थिती चिघळली असल्याचा दावा विरोधकांडून करण्यात येतोय. मात्र, हे सर्व दावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज फेटाळून लावले. आज त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत तेथील परिस्थितीचा आढावा विषद केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “स्थानिकांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प आणून त्यांच्यावर अन्याय करणार नाही. ग्रामस्थांवर अन्याय करून प्रकल्प पुढे न्यायचा नाही, अशी सरकारची भूमिका आहे. येथील ७० टक्के पेक्षा जास्त लोकांचं प्रकल्पाला समर्थन आहे.”

“मी स्वतः उद्योगमंत्र्यांशी बोललो आहे. पोलीस अधिकारी, अधिक्षक यांच्याशी चर्चा झाली आहे. तिथे आता शांतता आहे. स्पॉटवर आता कोणी नाहीय. काही लोक तिथे आले होते, दहा पंधरा मिनिटे त्यांसोबत पोलिसांनी चर्चा केली. सध्या शांतता आहे. लाठीचार्ज केलेलं नाही, असं कलेक्टरने सांगितलं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आंदोलनात बाहेरचे लोक

“हे सर्व भूमिपूत्र आहेत, गावकरी आहेत. त्यांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प, त्यांच्यावर अन्याय करून पुढे न्यायचा नाही, अशी भूमिका सरकारची आहे. ७० टक्के पेक्षा जास्त लोकांचं समर्थन आहे. काही लोक स्थानिक होते, काही बाहेरचे लोक होते, अशी माहिती मिळाली आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणतंही काम जबरदस्तीने होणार नाही, अशी ग्वाहीही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

“उद्योगमंत्रीही स्वतः शेतकऱ्यांशी बोलत आहेत. त्या भागात रोजगार देणारा हा प्रकल्प आहे. प्रकल्पाचा फायदा अधिकारी, कलेक्टर, एसपी, संबंधित विभागाचे अधिकारी समजावून सांगतील. या प्रकल्पाचा फायदा त्या भागातील लोकांना कसा होईल, हे सांगितलं जाईल. त्यांच्या सभा घेतल्या जातील, त्यांच्या संमतीनेच प्रकल्प पुढे नेला जाईल. उद्योगमंत्री स्वतः जातीने लक्ष ठेवून आहेत. शेतकऱ्यांना गावकऱ्यांना, मी शांततेचं आवाहन करतो. हे सर्व सामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांवर अन्याय होणार नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

विरोधकांवर टीकास्त्र

“जे प्रकल्प अडीच वर्षे बंद केले होते. आम्ही आल्यानंतर आठ दहा महिन्यांत बंद पडलेले प्रकल्प पुढे नेतोय. अडवलेले, प्रलंबित राहिलेल्या प्रकल्पांना चालना देतोय, ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री म्हणून सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातील जनता पाहतेय, अडीच वर्षे अहंकार आणि इगोमुळे प्रकल्प अडवले होते, ते पुढे नेतोय, याचं विरोधी पक्षाला दुःख आहे. विरोधासाठी विरोध करू नका. जाणीवपूर्वक भांडवल केलं जात आहे. प्रकल्पाला संमती असल्याचं पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं होतं. त्यामुळे राजकारणासाठी राजकारण करू नका”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 70 percent people agree to barsu refinery project says cm eknath shinde sgk