कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांच्या काठावर दमदार पाऊस कायम असल्याने खरीप हंगामाला दिलासा मिळताना ठिकठिकाणच्या पाणी साठवण प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा आहे. जून महिना कोरडा गेल्याने दुष्काळाची निर्माण झालेली स्थिती गेल्या ३ आठवडय़ातील पावसाने पुरती निवळली आहे. या कालावधीत सर्वच धरणांचा पाणीसाठा झपाटय़ाने वाढला आहे. केवळ १५ टक्क्यांवरून हा पाणीसाठा ७२.५९ टक्के झाला असून, पाऊस कायम असल्याने जलसिंचन प्रकल्प भरून वाहतील असेच चित्र आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख ९ प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये तर, कंसात त्याची टक्केवारी- कोयना जलसागर ५८ (५५), वारणा २९.०९ (८५), दूधगंगा १५.३७ (६१),राधानगरी ७.२५ (८७), धोम ७.०७ (५२.४२), कण्हेर ७.४८ (७४.०६), उरमोडी ८.५ (८४.९५), तारळी ४.८९ (८३.६७), धोमबलकवडी २.९० (७०.२१) या नऊ प्रमुख धरणांची क्षमता सुमारे १९३.६३ टीएमसी असून, त्यात सध्या १४०.५६ टीएमसी म्हणजेच ७२.५९ टक्के पाणीसाठा आहे. सध्या वारणा, राधानगरी व तारळी प्रकल्पातून ५,०८१ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. गतवर्षी सर्व प्रकल्प तुडुंब भरल्याने १ लाख क्युसेक पाण्याचा आजमितीला विसर्ग करण्यात येत होता. या धरणात ८८.७५ टक्के पाणीसाठा नोंदला गेला होता. पावसाळी हंगामाच्या ५२ दिवसात यंदा १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या महाकाय कोयना शिवसागरात सुमारे ४३ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. गतवर्षी तुलनेत दुपटीहून ज्यादा ९० टीएमसी पाण्याची भर कोयना धरणात झाली होती.
गेल्या ३६ तासात कोयनेच्या पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर विभागात १९४ एकूण २,६९०, महाबळेश्वर विभागात १२८ एकूण २,३३५ तर नवजा विभागात १९९ एकूण ३,२१८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. हा सरासरी पाऊस २,७४७.६६ मि. मी. असून, गतवर्षी तो ४,१३१ मि. मी. नोंदला गेला होता. आज सकाळी ८ वाजेपर्यंत पाटण तालुक्यात सरासरी ५७ एकूण ९७८.८३ तर, कराड तालुक्यात १५.०६ एकूण २९८.६३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. हाच पाऊस गतवर्षी पाटण तालुक्यात १,३३० तर कराड तालुक्यात ३५२.४ मि. मी. नोंदला गेला आहे. कोयना धरणक्षेत्रासह ठिकठिकाणचा पाऊस गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्क्याने कमी आहे. मात्र, गतवर्षी सरासरीच्या ३० टक्के ज्यादा पाऊस झाल्याने यंदाच्या पावसाने सर्वसाधारण सरासरी गाठली आहे. पावसाळय़ाचा उर्वरित कालावधी पाहता सर्वच पाणीसाठवण प्रकल्प क्षमतेने भरतील. खरीप हंगाम बऱ्यापकी यशस्वी होईल असेच सध्याचे चित्र आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील धरणांचा पाणीसाठा ७२ टक्क्यांवर
कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांच्या काठावर दमदार पाऊस कायम असल्याने खरीप हंगामाला दिलासा मिळताना ठिकठिकाणच्या पाणी साठवण प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा आहे.
आणखी वाचा
First published on: 30-07-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 72 percent water stock in maharashtra dams