लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : कृष्णा खोऱ्यात असलेल्या दहा धरणांपैकी राधानगरी व पाटगाव धरणे शंभर टक्के तर अन्य आठपैकी सात धरणांतील पाणीसाठा ८० टक्क्यांहून अधिक झाला आहे. यामध्ये राज्यातील महत्त्वाच्या कोयना धरणात ८५.५९ टीएमसी जलसाठा तयार झाला आहे.

गेल्या वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे उन्हाळ्याच्या अखेरीस राज्यातील सर्व धरणांतील जलसाठे हे मृतवत झाले होते. राज्यातील मोठे असलेले कोयना धरणही तळाशी गेले होते. कृष्णा खोऱ्यातून येणाऱ्या पाण्यावर साठवल्या जाणाऱ्या अलमट्टी धरणातील पाणीसाठाही यंदाच्या हंगामाच्या प्रारंभी १ जून रोजी २१.३७ टीएमसी म्हणजे केवळ १७ टक्के होता. मात्र गेल्या पंधरवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा खोऱ्यातील सर्वच धरणसाठे पुन्हा वेगाने भरू लागले आहेत. अलमट्टीचा साठा १८ जुलै रोजी ९९.३२ टीएमसी म्हणजेच ८१ टक्के झाला.

आणखी वाचा-धाराशिव : सव्वापाचशे किलो गांजा पकडला, एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

दरम्यान, पश्चिम घाटात असलेल्या धरणांपैकी राधानगरी, पाटगाव ही दोन धरणे शंभर टक्के भरली आहेत. राज्यातील महत्त्वाच्या कोयना धरणात ८५.५९ टीएमसी जलसाठा तयार झाला आहे. अन्य धरणांतील पाणीसाठा आणि कंसात साठवण क्षमता (टीएमसीमध्ये) पुढीलप्रमाणे. कोयना ८५.५९ (१०५.०५), धोम ११.३८ (१३.५०), कन्हेर ८.०६ (१०.१०), वारणा २९.२५ (३४.४०), दूधगंगा २१.९५ (२५.४०), राधानगरी ८.३६ (८.३६), तुळशी ३.२८ (३.४७), कासारी २.२६ (२.७७), पाटगाव ३.७२ (३.७२), धोम बलकवडी ३.४३ (४.०९), उरमोडी ७.७१ (९.९७), तारळी ५.०४ (५.८५), अलमट्टी ६७.६७ (१२३).

अलमट्टीतून साडेतीन लाख विसर्ग

पश्चिम घाटात पावसाची संततधार सुरू झाल्याने कृष्णा, पंचगंगा, वारणा या नदीतील पाणीपातळी वाढू लागली आहे. कोसळणारा पाऊस आणि धरणातील विसर्गामुळे सांगली, कोल्हापुरातील नद्यांना सध्या पूर आले आहेत. कोयनेतून ४२ हजार १००, धोममधून ४५३, कण्हेरमधून ४६२२, उरमोडीमधून ७५, तारळीतून ३५२६ आणि चांदोलीतून ८०९२ क्युसेकचा विसर्ग होत आहे. मुसळधार पाऊस आणि पश्चिम घाटातील धरणातून होणारा विसर्ग यामुळे सांगली, कोल्हापूरला पुराचा धोका अद्याप कायम आहे. यामुळे अलमट्टीतील विसर्ग सध्या साडेतीन लाख क्युसेक करण्यात आला आहे. यामुळे अलमट्टी धरणातील पाणीसाठा गेल्या तेरा दिवसांत ८१ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

आणखी वाचा-“राजकीय पक्षांचे प्रवक्ते सध्या काहीही वक्तव्य करतात”, रावसाहेब दानवेंचा रोख कुणाकडे?

सतर्कतेचा इशारा

सध्या सांगलीतील कृष्णेची पाणीपातळी ३७ फूट ७ इंचावर आली असली तरी धरणातील विसर्ग आणि पाणलोटमुक्त क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने आणखी दोन फुटापर्यंत वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे, असा इशारा जलसंपदा विभागाकडून बुधवारी देण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 80 percent water storage in 8 dams including koyna in krishna basin mrj
Show comments