रत्नागिरी : जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींमध्ये तब्बल ११०० सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. याचबरोबर, ६७ सरपंचांचीही बिनविरोध निवड झाली आहे.जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांसह १ हजार ७६६ सदस्यपदासाठी निवडणुका घोषित झाल्या आहेत. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून मागे घेण्याचीही मुदत संपली आहे. त्यामुळे आता या निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात काही ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थांनी एकत्र येत राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणुका बिनविरोध करण्यात पुढाकार घेतला. ते काही ठिकाणी यशस्वी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात २२२ सरपंचपदांसाठी छाननीअंती ६३५ अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी १६२जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ६७ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्ह्यात मंडणगड १, दापोली ९, खेड २, चिपळूण १३, गुहागर ९, संगमेश्वर १६, रत्नागिरी ६, लांजा २ व राजापूर ९ सरपंच बिनविरोध निवडले गेले आहेत. उर्वरित १५५ सरपंचपदांसाठी ४०६ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी काही ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युती अशा लढती आहेत, तर काही ठिकाणी तिरंगी लढती आहेत.

या ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या निवडणुकांमध्ये छाननीअंती २ हजार ६०६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ३०० जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे तब्बल १ हजार १०० सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्ह्यातील मंडणगड ३३, दापोली १८४, खेड ५२, चिपळूण १८१, गुहागर ११५, संगमेश्वर १६७, रत्नागिरी १३४, लांजा ९९ व राजापूर १३५ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ६६६ सदस्यपदांसाठीही १ हजार २०६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांनी आता प्रचाराला सुरुवात केली आहे.

वर्चस्व ठाकरे सेनेचे की शिंदे सेनेचे?

उमेदवार निश्चित झाल्यामुळे प्रचाराला आता जोरात सुरुवात झाली आहे. आमदार, खासदार, मंत्रीही  ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन करत आहेत. शिंदे गटाचे आमदार असलेल्या दापोली – खेडमध्ये भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष यांच्यात युती झाली आहे, तर रत्नागिरीत काही जागांवर समन्वय साधून निवडणूक लढवली जात आहे. अन्यत्र बऱ्याच प्रमाणात स्थानिक पातळीवरील राजकारण वरचढ ठरले आहे. या निवडणुकीत वर्चस्व ठाकरे सेनेचे की शिंदे सेनेचे, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.