पक्षीगणनेत तब्बल १५ हजार ६३८ निरीक्षणे
ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण भारतात आयोजित पक्षीगणनेत तब्बल १५ हजार ६३८ निरीक्षणे नोंदवण्यात आली. यात महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजे एकूण १२३ याद्या प्राप्त झाल्या असून देशभरात एकूण पाचशेहून अधिक प्रजातींची नोंद झाली.
वृक्षराजी आणि पर्यावरणाची हानी गडद होत असताना देशातील पाखरांबाबतच्या नोंदी काहीसे सुखचित्र निर्माण करणाऱ्या आहेत. मात्र अतिशय धोकादायक वर्गात पक्ष्यांची एक प्रजाती असून, चार प्रजातींबाबत धोक्याची सूचनाही या नोंदींतून मिळाली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्यावतीने व ‘बर्ड काऊंट इंडिया’च्या सहकार्याने भारतातील २२ राज्यांत १५ नोव्हेंबर रोजी आयोजित पक्षीगणनेदरम्यान या नोंदी करण्यात आल्या आहेत.
धोक्याची घंटा
पक्षीगणनेदरम्यान आढळलेल्या ५१४ पक्षीप्रजातींपैकी सुमारे ३० प्रजाती या आययूसीएनच्या २०१५च्या लाल यादीत धोकादायक वर्गातील आहेत. अतिशय धोकादायक वर्गात पांढऱ्या पाठीचे गिधाड तसेच धोकादायक वर्गातील ब्लॅक बेलीड टर्न, इजिप्शियन व्हल्चर, ग्रेट नॉट व स्टेप ईगल या पक्षीप्रजातीचा यात समावेश आहे.
सुखचित्र!
निरीक्षणांमध्ये २२ राज्यांतील २८० लोकांनी ५१४ प्रजातींची नोंद केली. पक्षी प्रजातीच्या ५४९ याद्यांतील ही निरीक्षणे होती. निरीक्षणादरम्यान पहिल्यांदाच ३८३ पाखरांबाबत अतिशय वेगळ्या नोंदी झाल्या आहेत. यांत काही पक्षीनिरीक्षकांनी स्वतंत्र नोंदीही केल्या होत्या.
२२ राज्यांमध्ये उपक्रम
भारतातील २२ राज्यांमधील ९९ जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यात आला. यात महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजे एकूण १२३ यादी प्राप्त झाल्या. केरळ राज्यातून ५९ यादी तर कर्नाटक व तामिळनाडूमधून ४० यादी प्राप्त झाल्या. उत्तर भारतातील दिल्ली सहा, हरयाणा तीन, उत्तर प्रदेश ७ आणि उत्तराखंडमध्ये २४ याद्या प्राप्त झाल्या. उत्तर पूर्व आणि पूर्व भारतातील अरुणाचल प्रदेशात दोन, आसाममध्ये सात, मिझोराममध्ये तीन, ओदिशात पाच, पश्चिम बंगालमध्ये नऊ याद्या प्राप्त झाल्या. मध्य आणि पश्चिम भारतातील छत्तीसगडमध्ये १३, गुजरातमध्ये सात, झारखंडमध्ये एक, मध्यप्रदेशमध्ये चार, महाराष्ट्र १२३ आणि राजस्थानमधून एक यादी प्राप्त झाली. दक्षिण आणि किनारपट्टीच्या भागातील आंध्रपदेशात नऊ, गोवा १२, कर्नाटक ४०, केरळ ५९, तामिळनाडू ४०, तेलंगना ४ आणि अंदमान व निकोबारमधून चार याद्या प्राप्त झाल्या.
सलीम अली पक्षी गणना हा उपक्रम पक्षीजगतात रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक सामान्य मनुष्याला जोडण्यासाठी आहे. त्यांना केवळ पक्षी निरीक्षणात सहभागी करून घेणे हाच एकमेव उद्देश नाही तर पक्षी निरीक्षणाकरिता राजदूत म्हणून त्यांना तयार करणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
– डॉ. दीपक आपटे, संचालक-बीएनएचएस
भारताच्या दुर्गम भागातील प्रत्येक पक्षीनिरीक्षक भारतीय पक्षीविद्य्ोसाठी मदत करू शकतो. त्यासाठी त्याने ‘ईबर्ड’ संकेतस्थळावर त्याची निरीक्षणे नोंदवावीत. यापुढे हे पक्षीनिरीक्षण प्रत्येक वर्षी १२ सप्टेंबरला घेण्यात येणार आहे.
– डॉ. राजू कसंबे, बीएनएचएसच्या आयबीए कार्यक्रमाचे व्यवस्थापक