‘मध्य रेल्वेतर्फे गणपतीसाठी रेल्वेच्या अधिक ११४ गाडय़ा नव्याने सोडण्यात येतील. त्याचबरोबर कुंभमेळ्यासाठीही रेल्वेची विशेष गाडी सोडण्यात येणार आहे,’ अशी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे शनिवारी केली.
पुण्यातील मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकीय कार्यालयाचे उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते शनिवारी झाले. या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे, खासदार अनिल शिरोळे, अ‍ॅड. वंदना चव्हाण, आमदार बाळा भेगडे, मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक सुनीलकुमार सूद, विभागीय व्यवस्थापक सुनीत शर्मा उपस्थित होते.
मध्य रेल्वेतर्फे गणपतीसाठी ६० विशेष गाडय़ा सोडण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. त्याचबरोबर आता ११४ गाडय़ा नव्याने सोडण्यात येतील अशी घोषणा प्रभू यांनी केली आहे. त्याचप्रमाणे पुणे-मिरज-लोंढा या मार्गाच्या दुपदरीकरणासाठी ४ हजार ७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही प्रभू यांनी सांगितले. या वेळी प्रभू म्हणाले, ‘कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राशी जोडण्याचाही प्रस्ताव आहे. त्यानुसार कराड-चिपळूण, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे सुरू केली जाईल. राज्य सरकारने रेल्वे कंपनी स्थापन केली असून त्यासाठी दहा हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. रेल्वेत ताज्या खाद्यपदार्थासाठी ‘बेस किचन’ पुरवण्यात येईल.

Story img Loader