प्रदूषणामुळे जैवविविधता धोक्यात; मच्छीमारांना फटका

कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे समुद्री जीवांचे अस्तित्वच धोक्यात येऊ  लागले आहे. वसईतील किनारे प्रदूषित झालेले आहे, मात्र आता प्रदूषणाचा फटका मासेमारीलाही बसू लागला आहे. मच्छीमारांच्या जाळ्यात आता मासळीपेक्षा कचराच जास्त येऊ  लागला आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून हा प्रकार भविष्यातील धोक्याची घंटा असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.

समुद्रकिनारी असलेल्या पालघर जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात मासेमारी व्यवसाय केला जातो. या भागातील शेकडो मच्छीमार या व्यवसायावर आपली उपजीविका करत आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून वसईतील मच्छीमारांना वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या आहे समुद्रात वाढत जाणाऱ्या कचऱ्याची. वेगवेगळ्या कारणांमुळे समुद्रात कचरा आणि सांडपाणी टाकले जात असल्याने समुद्र प्रदूषीत होत आहे. हा वाढता कचरा मच्छीमारांसाठी केवळ डोकेदुखीच बनलेला नाही तर भविष्यातील मोठय़ा संकटाचे संकेत देत आहे. दिवसेंदिवस या कचऱ्याचे प्रमाण वाढू लागल्याने समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या मच्छीमारांना मासेमारी करण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात कचरा अधिक प्रमाणात दिसून आला आहे. या कचऱ्यात जास्त प्रमाणात प्लास्टिक पिशव्या व खाद्यपाकिटे आढळून  येत आहेत. यापूर्वी फक्त किनाऱ्यावर कचरा आढळत होता. आता खोल समुद्रातही कचरा आढळू लागल्याचे मच्छीमारांनी सांगितले.

खाडीच्या पात्रात व समुद्रात काहीजण सर्रास कचरा टाकून देत आहे. आजही किनाऱ्यावर येणाऱ्या काही पर्यटकांकडून कचरा समुद्रात टाकला जात असतो. तर काहीजण चालत्या लोकल गाडीतूनही निर्माल्याच्या नावाखाली इतर कचरा पाण्यात फेकून देतात. वसई परिसरात नायगाव, आचोले, नालासोपारा, भाईंदर, वैतरणा, घोडबंदर अशा छोटय़ा-मोठया खाडय़ा आहेत. या खाडय़ांच्या पात्रातही कचरा टाकला जातो हा कचरा समुद्राला आलेल्या भरतीमुळे थेट समुद्राला येऊन मिसळतो.

दैनंदिन मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या मच्छीमारांच्या जाळ्यात मासे कमी व कचरा जास्त अडकून येत असल्याने माशांची आवक कमी झाली असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. सुरुवातीला ज्या भागात जास्त प्रमाणात मासळी मिळत होती, त्याभागात दिवसभर थांबूनही मासळी मिळत नसल्याने दैनंदिन रोजगारावर याचा मोठा परिणाम होऊ  लागला आहे.

दूषीत सांडपाण्यामुळे जैवविविधता धोक्यात

एकीकडे समुद्रात कचरा वाढत असातना सांडपाणी, कारखान्यांमधून रासायनिक पाणी समुद्रामध्ये सोडले जाते. यामुळे समुद्रातील जैवविविधता  धोक्यात आली आहे. प्रशासनाने अशा प्रकारे समुद्रात कचरा टाकणाऱ्यांविरोधात कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र असे होत नसल्याने असे प्रकार वाढीस लागून स्थानिक मच्छीमारांच्या रोजगारासह समुद्रातील निसर्गसंपदा धोक्यात आली आहे.

विविध ठिकाणच्या भागातून कचरा समुद्रात  टाकला जात असतो. त्यामुळे सर्व कचरा समुद्रात आल्याने प्रदूषण तर होतेच. पण हाच कचरा मच्छीमारांच्या जाळ्यात अडकत असल्याने मासे कमी मिळतात.

– तुलसीदास कोळी, मच्छीमार

समुद्रात कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने जाळ्याला मासळी लागत नाही. त्यात घोडबंदर, कामन दिशेने येणाऱ्या दुर्गंधीच्या पाण्यामुळे मासळीचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. त्यामुळे आमचे उत्पन्नावरही मोठा परिणाम होत आहे. कचरा टाकणाऱ्यांविरोधात कारवाई करून उपाययोजना करावी.

– अशोक गोगलेकर, मच्छीमार

Story img Loader