सामाजिक संकेतस्थळांवरून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेणाऱ्या भाजपने राज्याच्या निवडणुकीत ‘मॉर्निग वॉक’सुद्धा प्रचाराचा केंद्रबिंदू करण्याचे ठरविले आहे. भाजप कार्यकर्त्यांनी पहाटे फिरायला जाणाऱ्या व्यक्तींच्या गाठीभेटी घ्याव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. उमेदवाराचा प्रचार करताना त्या-त्या विधानसभेचा स्वतंत्र जाहीरनामा करण्याबाबतही कळविण्यात आले आहे. २ ते ७ सप्टेंबर दरम्यान २८८ मतदारसंघांत भाजपचा जाहीरनामा तयार होणार आहे. शिवसेना व अन्य घटकपक्षांना जागा वाटून दिल्या असल्या, तरी या मतदारसंघांचाही जाहीरनामा भाजप तयार करेल, असे निवडणूक संचालन समितीचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मराठवाडय़ाच्या ४ जिल्ह्य़ांतील २१ मतदारसंघांच्या संचालन समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी येथे घेण्यात आली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून २० कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी देण्यात आली. विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, ते कसे सोडवायचे या विषयीचा जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. राज्यस्तरावर १५ सप्टेंबपर्यंत त्याचे एकत्रीकरण होईल आणि त्यानंतर महायुतीच्या जाहीरनाम्यात ते मुद्दे मांडले जातील.
लोकसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक माध्यमे व सामाजिक संकेतस्थळांचा मोठय़ा प्रमाणावर प्रचारात उपयोग केला गेला. विधानसभा निवडणुकीत या माध्यमांबरोबरच प्रचाराचे ‘काही हटके’ प्रयोग करण्याचे ठरविण्यात आले आहे. पहाटे फिरायला जाणाऱ्या व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन उमेदवाराचा प्रचार करावा, असे सांगण्यात आले. विधानसभा क्षेत्रात या साठी व्यक्तींच्या नेमणुकाही करण्यात आल्या आहेत. दुष्काळी भागासाठी महामंडळे, रखडलेल्या सिंचन योजना, पाणी असताना वीज उपलब्ध नसल्याबाबतचे प्रश्न, बनावट बियाणे आणि राज्याची दिवाळखोरी या मुद्दय़ांवर प्रचारात भर दिला जाणार आहे. पथनाटय़ांच्या माध्यमातूनही प्रचार केला जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
महायुतीतील घटकपक्षांची गोळाबेरीज केवळ ३०!
घटकपक्षांच्या जागावाटपाबाबतचा निर्णय जवळपास पूर्ण झाला आहे. थोडीशी खळखळ बाकी आहे. लवकरच नाराजी दूर केली जाईल आणि महायुती खंबीरपणे निवडणुकीला सामोरे जाईल, असेही पाटील म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटना १२ जागा घेण्याच्या मानसिकतेपर्यंत आली आहे. त्यांना १० जागा दिल्या जाऊ शकतात. रिपब्लिकन पक्षालाही साधारणत: तेवढय़ाच जागा दिल्या जातील. राष्ट्रीय समाज पक्ष आणि विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षालाही काही जागा मिळतील. मात्र, हा सगळा आकडा ३० पेक्षा असणार नाही, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
भाजपचा आता ‘मॉर्निग वॉक’वर भर!
सामाजिक संकेतस्थळांवरून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेणाऱ्या भाजपने राज्याच्या निवडणुकीत ‘मॉर्निग वॉक’सुद्धा प्रचाराचा केंद्रबिंदू करण्याचे ठरविले आहे. भाजप कार्यकर्त्यांनी पहाटे फिरायला जाणाऱ्या व्यक्तींच्या गाठीभेटी घ्याव्यात, अशा सूचना दिल्या आहेत.
First published on: 28-08-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morning walk of bjp