राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या जुन्नरमधील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारवर जोरदार टीका केली. ‘केंद्रामधील सरकार हे रयतेचे आहे की एक दोन उद्योगपतींचे आहे? असा सवाल कोल्हे यांनी आपल्या भाषणामध्ये उपस्थित केला. शिवरायांचे नाव घेत सन २०१४ मध्ये विजयी झाला. जनतेने त्यांना कल्याणकारी राज्य करण्यासाठी निवडून दिले. मात्र, गेल्या पाच वर्षांत रायगडच काय तर राज्यातील कोणत्याही किल्ल्यावर ते फिरकले नाहीत. त्यांना महाराजांचा विसर पडला. नोटाबंदीद्वारे काळा पैसा परत आणू. या परत आणलेल्या पैशातून दहशतवाद्यांविरोधात कारवाई करु असे आश्वासनही निवडणुकांच्या वेळी सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र, याच सरकारच्या काळात दहशतवाद मोठ्या प्रमाणात वाढला असल्याची टीका कोल्हे यांनी आपल्या भाषणामध्ये केली.
कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांचे मूळ गाव असणाऱ्या नारायणगाव येथे कोल्हे यांच्यासाठी खास स्वागत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष यांनी एकत्रितपणे या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यामध्ये भाषण देताना ‘पुलवामा हल्ल्यात ४२ जवान शहीद झाले. मात्र, एका वृत्तपत्रामध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार या सरकारच्या काळात ४५० जवान शहीद झालेले असताना ५६ इंचांची छाती दिसते कशी?’ असा खोचक सवाल कोल्हे यांनी मोदींचे नाव न घेता उपस्थित केला. शिवनेरीचा शिलेदार म्हणून १५ वर्षे काम करणारे प्रतिनिधी व मंत्री यांना या परिसराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा न देऊ शकल्याबद्दल कोल्हे यांनी आपल्या भाषणात नाराजी व्यक्त केली.
अमोल कोल्हेंबरोबरच या मेळाव्यामध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार विलास लांडे, आमदार दिलीप वळसे पाटील, दिलीप ढमढेरे, बाळासाहेब दांगट, युवा नेते अतुल बेनके, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकरही उपस्थित होते.
छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारून घराघरात पोहचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांनी 1 मार्च रोजी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याच्या वेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी अमोल कोल्हेंच्या प्रवेशामुळे नक्कीच निवडणुकीत फायदा होणार आहे असा विश्वास व्यक्त केला होता. 2014 मध्ये कोल्हे यांनी शिवसेनेत प्रवेश करुन विधानसभा निवडणुकांच्या वेळी शिवसेनेचे स्टार प्रचारक काम केले होते. मात्र आता सेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रावादीचे स्टार प्रचारक म्हणून राज्यभर दौरे करतील.