सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनस बांधले पण रेल्वेगाडय़ांना थांबा नाही!
सिंधुदुर्गचा अर्थातच कोकणचा सुपुत्र भारतीय रेल्वेमंत्री झाला आणि कोकण रेल्वेला अच्छे दिन आल्याची चाकरमानी लोकांची प्रतिक्रिया उमटली. अच्छे दिनाची प्रतीक्षा करत असतानाच रेल्वेमंत्री पदावरून सुरेश प्रभू गेले आणि प्रवासी वर्गाची निराशा आणखीनच वाढली. सावंतवाडी रोड टर्मिनसचे काम पूर्ण झाले पण रेल्वे गाडय़ांना थांबाच नाही. त्यामुळे प्रवाशांच्या नशिबी प्रवासाचे हाल वाढतच गेले आहेत.
गेल्या दीड महिन्यापासून मांडवी आणि दिवा रेल्वे मुंबई ते सावंतवाडी दिशेने येताना उशिराने धावत आहे. या गाडय़ांतून येणारे प्रवासी ग्रामीण भागात राहतात. या गोरगरीब प्रवाशांना रेल्वे काळोख पडल्यावर पोहचत असल्याने रिक्षा, सहा आसनी रिक्षा करूनच गावी जावे लागत आहे. त्यामुळे रेल्वेच्या प्रवासापेक्षा रिक्षाला दीडशे ते दोनशे रुपये खर्च येतो. या आर्थिक कोंडीने प्रवासी हैराण झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यत रात्रीच्या वेळी रेल्वे थांबल्यास दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या चाकरमानी लोकांना जाण्यासाठी खासगी वाहन भाडय़ाने न्यावे लागते. रेल्वे तिकिटापेक्षा हे भाडे अधिकच आहे. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्यावर आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. गणेश चतुर्थीपासून वेळापत्रकाचा घोळ कायमचा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यत सर्वच रेल्वेना थांबा हवा
सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा आहे. दक्षिणेकडे धावणाऱ्या दहा ते बारा रेल्वे गाडय़ांना सिंधुदुर्गात थांबा नाही. कणकवली, कुडाळ व सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर या गाडय़ांना एक तरी थांबा द्यायला हवा. पण धूळ उडवीत जाणाऱ्या या गाडय़ांना थांबाही नाही. आणि त्या गाडय़ा रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडत आहे. पर्यटन जिल्ह्यच्या विकासासाठी या मार्गावरून धावणाऱ्या प्रत्येक रेल्वेला थांबा दिला जावा अशी मागणी आहे.
स्थानकांची सुधारणा; प्रवाशांची गैरसोय
सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाले तेव्हा कोकण रेल्वेला अच्छे दिन आल्याची जनतेची भावना बनली. आता कोकण रेल्वेला भारतीय रेल्वेत स्थान मिळेल अशी अपेक्षा वाढली. सुरेश प्रभू यांनी रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण, सुधारणा घडविली पण प्रवाशांची होणारी गैरसोय तशीच राहिली. रेल्वेचा विकास आणि प्रवाशांची गैरसोय दूर होईल असे वाटत असतानाच सुरेश प्रभू यांच्याकडील रेल्वे खाते गेले. मुंबईकर चाकरमानी आणि कोकणच्या जनतेच्या प्रवासातील गैरसोयी दूर करणाऱ्या दुपदरीकरण व विद्युतीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात वेगाने सुरुवात व्हायला हवी होती, पण कोकण रेल्वेच्या प्रकल्पांकडे नवीन रेल्वेमंत्र्यांचे लक्ष नसल्याची आमजनतेची भावना बनली आहे.
सावंतवाडी टर्मिनस झाले पण..
सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनस साकारले. त्यामुळे मडुरा आणि सावंतवाडी रोड टर्मिनसच्या वादाचा प्रश्न बाजूला पडला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यामुळे आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्यामुळे रेल्वे टर्मिनस पूर्ण झाले. आता या ठिकाणी चार लाइन निर्माण झाल्याने या मार्गावरून धावणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीला थांबा मिळण्यास हरकत नाही. पण टर्मिनस होऊनही एकाही गाडीला थांबा मिळाला नाही.
मंगला एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस व तेजस एक्स्प्रेसला थांबा मिळावा अशी प्रवाशांची अपेक्षा होती. पण तत्कालीन रेल्वमंत्री सुरेश प्रभू त्या पूर्ण करू शकले नाहीत, हे कटुसत्य आहे.
दिवा दादपर्यंत जावी
सावंतवाडी- दिवा रेल्वे कोकण रेल्वेच्या रुळावरून गोरगरीब प्रवाशांना घेऊन धावते. कोकणातील चाकरमानी या गाडीने जातो. या गाडीला १८ डबे आहेत. दिवा पॅसेंजर २४ डब्याची करून ती दादपर्यंत जायला हवी. तांदूळ, फणस, पोहे, नारळ घेऊन जाणारा प्रवासी दिवा येथे उतरून पुढे कंटाळवाणा प्रवास करतो. या हालअपेष्टा सुपुत्र असणाऱ्या तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिसल्या नाहीत. ही चाकरमानी मंडळीना खंत वाटते.
राज्यराणी एक्स्प्रेस रेल्वे सावंतवाडी-दादर धावते. या गाडीचे नामकरण तुतारी करण्यात आले आहे. ही रेल्वे १५ डब्यांची धावते ती २४ डब्यांची धावली पाहिजे.
तुतारी एक्स्प्रेस व दिवा पॅसेंजर २४ डब्यांची धावली तर कोकणातील प्रवाशांचा त्रासदायक प्रवास सुखकर होईल. सावंतवाडी टर्मिनस होऊनही कोकणकन्या, मांडवी, दिवा, तुतारी, गांधीधाम, राजधानी, एर्नाकुलम पुणे, गरीब रथ, डबलडेकर, वास्को-पाटणा या गाडय़ांना थांबा आहे
. मंगला व जनशताब्दीला थांबा मिळावा या प्रवाशांच्या अपेक्षा आहेत. कोकण रेल्वेतील प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि कायमच वेटिंगलिस्ट वरील प्रवासी वर्गाला आरक्षण मिळाले तरच कोकण रेल्वे प्रवाशांना सुखकर अच्छे दिन येतील अशा अपेक्षा आहेत.