बारावीच्या परीक्षेमध्ये राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी नव्वदच्या पुढे गेली असतानाच पुणे विभागातील निकालाच्या टक्केवारीनेही पहिल्यांदाच टक्केवारीची नव्वदी ओलांडली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदा पुणे विभागातून नव्याने परीक्षेस बसलेले ९०.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागातील पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्य़ांमध्ये सर्वाधिक ९२.५८ टक्के निकाल अहमदनगर जिल्ह्य़ात लागला आहे.
बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, सोमवारी दुपारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने संकेतस्थळावर जाहीर केला. नगर जिल्हय़ाचा निकाल ८९.९७ टक्के लागला. यंदाही जिल्हय़ाचा निकाल पुणे विभागात सर्वाधिक आहे. जिल्हय़ात मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च दरम्यान झाली होती. निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आल्याने निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफेवर विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. यंदा विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची झेरॉक्स कॉपीही काढता येणार होती. मूळ गुणपत्र शाळेत विद्यार्थ्यांना १० जूनला उपलब्ध होणार आहे.
जिल्हय़ात ३४ हजार १९५ मुलांनी परीक्षेसाठी नाव नोंदवले होते. त्यातील ३४ हजार ८७ परीक्षेस दाखल झाले. त्यातील २९ हजार ४९७ उत्तीर्ण (८६.५३ टक्के) झाले. तर २२ हजार ७२३ मुलींपैकी २२ हजार ६७३ परीक्षेस दाखल झाल्या, त्यातील २१ हजार ५६८ उत्तीर्ण (९५.१३ टक्के) झाल्या. नियमित परीक्षेसाठी ३१ हजार ६२० जणांनी नाव नोंदवले होते, पैकी ३१ हजार ५८२ परीक्षेस बसले, निकाल ८९.९४ टक्के (२८ हजार ४०६) लागला. मुलींमध्ये २२ हजार २०८ पैकी २२ हजार ६९ परीक्षेस बसल्या, निकाल ९६.३८ टक्के (२१ हजार २६३) लागला.
पुनर्परीक्षेसाठी २ हजार ५७५ पैकी २ हजार ५०५ परीक्षेस बसले. त्यातील १ हजार ९१ उत्तीर्ण (४३.५३ टक्के) लागला, तर मुलींमध्ये ६२० पैकी ६०४ परीक्षेस दाखल झाल्या, त्यातील ३०५ (५०.५० टक्के) उत्तीर्ण झाल्या. पुनर्परीक्षेतील विद्यार्थ्यांना झालेली परीक्षा ही शेवटची संधी होती. आता त्यांना पुन्हा परीक्षेला बसावयाचे असल्यास नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यावी लागणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
 जिल्हय़ाचा कला शाखेचा निकाल ८७.९१ टक्के, वाणिज्य शाखेचा ९३.४५ टक्के, शास्त्र शाखेचा ९६.३० टक्के, किमान कौशल्यावरील अभ्यासक्रमाचा ९०.९२ टक्के निकाल लागला.
पारनेर सर्वाधिक
तालुकानिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे-अकोले ८९.५३ टक्के, जामखेड ९४.३३, कर्जत ९२.४५, कोपरगाव ८९.७२, नगर ९१.०६, नेवासे ८९.१२, पारनेर ९६.२३, पाथर्डी ९५.५२, राहाता ९३.६०, राहुरी ९२.५७, संगमनेर ९६.०१, शेवगाव ९२.४९, श्रीगोंदे ९१.८२ व श्रीरामपूर ९१.९१ टक्के.
विभागातही विज्ञानाचे विद्यार्थी आघाडीवर
राज्यातील निकालाप्रमाणे पुणे विभागातही विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली आहे. सर्वाधिक विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेतून परीक्षा दिली असून, याच शाखेतील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागात ८१ हजार ९९ विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ७६ हजार ६१९ म्हणजेच ९४.४८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेच्या ५२ हजार ५३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ४७ हजार ८१२ म्हणजे ९१.३४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेच्या ५९ हजार ९१५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ८५.३१ टक्के म्हणजे ७६ हजार ६१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
जिल्हानिहाय निकाल
– अहमदनगर- ९२.५८ टक्के
– पुणे- ९०.४९ टक्के
– सोलापूर- ८९.०२ टक्के

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा