रवींद्र जुनारकर

सीमावर्ती भागातून गडचिरोली जिल्ह्य़ात दाखल झाल्याची चर्चा

भूसुरुंगस्फोट, जाळपोळ, हत्या तथा हिंसाचार घडवून आणण्यासाठी आजवर नक्षली पुरुष सक्रिय राहायचे. मात्र दादापूर येथे कंत्राटदाराच्या वाहनांची जाळपोळ तथा जांभूळखेडा येथील भूसुरुंगस्फोट यात नक्षली दलममधील महिला सक्रिय होत्या. दादापूर या गावातील नक्षली महिलांनी केलेली जाळपोळ व आक्रमकता बघून ग्रामस्थही घाबरले होते. विशेष म्हणजे, चळवळीतील या सर्व महिला व मुली १८ ते २५ वर्षे वयोगटातील होत्या आणि हिंदी भाषेत संवाद साधत होत्या. याचाच अर्थ महिलांचे हे दलम छत्तीसगडमधून आले होते, अशी सूत्रांची माहिती आहे.

दक्षिण गडचिरोलीसोबतच नक्षलवाद्यांनी आता आपला मोर्चा उत्तर गडचिरोली विभागाकडे वळवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नक्षलवाद्यांनी महाराष्ट्र दिनी जांभूळखेडा येथे भूसुरुंगस्फोट घडवून आणला.  या स्फोटात १५ पोलीस शिपाई शहीद झाले. उत्तर गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या कुरखेडा, कोरची, आरमोरी, वडसा व पुराडा या भागात मागील काही महिन्यांपासून नक्षलवादी सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे, या भागात नक्षलवाद्यांचे टिपागड, कोरची, कुरखेडा व खोब्रामेंढा दलम सक्रिय आहे. या चारही दलममध्ये महिला नक्षलवाद्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. दक्षिण गडचिरोलीची जबाबदारी ही रामको या जहाल नक्षली कमांडरवर होती, तर उत्तर गडचिरोलीचे नेतृत्व तिचा पती भास्कर हा नक्षली नेता करतो. मात्र २७ एप्रिलला झालेल्या नक्षल- पोलीस चकमकीत रामको ऊर्फ कमला नरोटे व तिची सहकारी मनू दुर्वा ठार झाले. गेल्यावर्षी पोलिसांनी ४० नक्षलवाद्यांना ठार केल्याचा बदला तथा रामकोच्या हत्येचा बदला घेण्यासाठी म्हणून छत्तीसगडमधून मोठय़ा संख्येने गडचिरोलीत नक्षलवादी दाखल झाले. यात महिला नक्षलींची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रस्तुत प्रतिनिधीने दादापूर या गावाला भेट दिली असता तेथील ग्रामस्थांनी सुद्धा नक्षलवादी रात्री ११ वाजताच्या सुमारास गावात दाखल झाले तेव्हा त्यांच्यासोबत महिला नक्षलवादी मोठय़ा संख्येने होत्या. किंबहुना कंत्राटदाराच्या वाहनाची जाळपोळ ही नक्षलवाद्यांच्या महिला दलमने केली, अशी शंकाही गावातील एका व्यक्तीने बोलून दाखवली. या महिला व मुली साधारणत: १८ ते २५ या वयोगटातील होत्या. त्यांच्या हातात शस्त्र होती. आपसात त्या एकमेकांशी हिंदीत संवाद साधत होत्या. गावातील काही लोकांना त्यांनी झोपेतून उठवले तेव्हाही त्या हिंदी भाषेत बोलत होत्या. केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतानाही त्या हिंदी भाषेचा प्रयोग करीत होत्या. याचाच अर्थ महिलांचे हे अख्खे दलम लगतच्या छत्तीसगड राज्यातून गडचिरोलीच्या सीमावर्ती भागात दाखल झाले असावे, अशीही माहिती सूत्रांनी दिली. या नक्षल मुली व महिला अतिशय आक्रमक होत्या. त्या आपसात कंत्राटदार की सब गाडीया जला दो.. डिझेल से भरा टँकर जंगल मे ले जाके जलाओ.. अशा बोलत होत्या. या नक्षली मुलींनी तर एक वाहन स्वत: रस्त्यावर ढकलत आणले आणि जाळले. पहाटे तीन वाजेपर्यंत या नक्षली मुली गावातच होत्या. त्यांची भाषा अतिशय हिंसक होती. तिथूनच या नक्षली मुली जांभूळखेडा येथे गेल्या असाव्यात, असाही एक अंदाज आहे. या दोन्ही कारवायानंतर हे दलम आता महाराष्ट्र- छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील घनदाट जंगलात निघून गेले.

पत्नीच्या हत्येचा बदल्याचा कट भास्करचा

उत्तर गडचिरोली विभागाची संपूर्ण सूत्रे ही नक्षली नेता भास्कर याच्याकडे आहे, तर त्याची पत्नी दक्षिण गडचिरोलीची नेता होती. मात्र २७ एप्रिलच्या चकमकीत भास्करची पत्नी रामको ठार झाली. यामुळे भास्कर चांगलाच संतापला होता. याच संतापाच्या भरात त्याने हा भूसुरुंगस्फोटाचा कट रचला असावा, अशीही चर्चा या भागात आहे. भास्करने पत्नीचा बदला घेतला, अशीही चर्चा ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात आहे.

Story img Loader