अलिबाग – मुलींचे शिक्षण आणि दैनंदिन जीवन जगताना झालेले कर्ज त्यातच नवरा लक्ष देत नाही की कसलीही मदत करत नाही यामुळे जगणे असह्य झाल्याने आपल्या दोन मुलींना सोबत घेऊन एका आईने स्वतःही कोकण रेल्वेखाली आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे घडली. या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे.
गोरेगाव येथील गावडे काॅम्पलेक्स या वसाहतीत राहणाऱ्या रिना जयमोहन नायर या महिलेने आपली चौदा वर्षांची मुलगी जिया आणि अकरा वर्षांची मुलगी लक्ष्मी या दोन चिमुकल्यांना सोबत घेऊन कोकण रेल्वेच्या कोकण कन्या एक्स्प्रेस या गाडीखाली पहाटे तीन वाजता आत्महत्या केली. मोटारमन यांनी या अपघाताची माहिती माणगाव रेल्वे स्थानकात दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला गोरेगाव पोलिसांनी तातडीने रेल्वे ट्रॅक गाठले मात्र दोनच मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू झाला पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कापडेकर, सोपान रासकर, हवालदार यशवंत चव्हाण, दिलीप बेंडूगडे, धोंडिबा गिते यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी कसून शोध घेतला असता दुपारी जिया हिचा मृतदेह ट्रॅक नजीकच्या झुडपात आढळून आला.
हेही वाचा – सोलापूर : लाखाची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली; फौजदारावर गुन्हा दाखल
गोरेगाव रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर दोन महिलांना अपघात झाला इतकाच मेसेज पोलीस यंत्रणेला मिळाला होता मात्र या अपघाताची चर्चा होताच पहाटे दुर्दैवी रिना यांची मैत्रीण स्वतःहून गोरेगाव पोलीस ठाण्यात आली व तीने आपल्याला मैत्रिणीने व्हाईस मेसेज पाठवला होता अशी माहीती दिली. रिना यांनी पाठवलेल्या व्हाईस मेसेज मध्ये… वहिनी मला माफ करा मी तुम्हाला बोलले परंतु माझ्याकडून नाही होत मी माझ्या दोन्ही मुलींना घेऊन जातेय जीव द्यायला मोहन मुळे. त्याला इकडे बोलवून माझे जे देणे आहे ते द्यायला सांगा आणि रूम सोडून जायला सांगा.. रिना यांचा हा शेवटचा आवाज जड अंतःकरणाने त्यांनी हा आपल्या आवाजातील मेसेज जवळच्या मैत्रिणीला रात्री मृत्यूपूर्वी पाठवला होता यानंतर या धक्कादायक प्रकाराचा उलगडा झाला आणि दोन मृतदेहांची ओळख पटली ती रिना आणि लक्ष्मीची यानंतर शोध सुरू झाला तो जिया चा… रेल्वे ट्रॅकवरती कुठेही काही सापडत नव्हते त्यामुळे संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला.. जिया जर जिवंत असेल तर ती एकमेव घटनाक्रमाची साक्षीदार होती त्यामुळे पोलीस, स्थानिक ग्रामस्थ सर्वत्र शोध घेत होते मात्र हा शोध अखेर दुपारी थांबला कारण जिया हिचा मृतदेह अपघातस्थळाच्या शेजारी झुडपात सापडला.