माहेरहून ५० हजार रुपये आणले नाहीत म्हणून महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून मारल्याची घटना तालुक्यातील माळेवाडी येथे घडली. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
माळेवाडी येथील विवाहिता हिराबाई रवींद्र उमाप हिने माहेरहून घर बांधण्यासाठी व रिक्षा घेण्यासाठी ५० हजार रुपये आणावेत म्हणून पती रवींद्र लक्ष्मण उमाप, सासरा लक्ष्मण उमाप व सासू सुनीता तिचा शारीरिक व मानसिक छळ करत असत. शुक्रवारी सासरा लक्ष्मण याने रॉकेलचा डबा तिच्या अंगावर ओतला. सासू सुनीता हिने तिचे दोन्ही हात धरले. पती रवींद्र याने काडी पेटवून तिच्या अंगावर टाकली. हिराबाईने पेट घेतल्यानंतर तिने पतीला मिठी मारली. त्यामुळे रवींद्रही भाजला गेला. या आरडाओरडीत शेजारचे लोक जमा झाले. त्यांनी तिला साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. पती रवींद्र यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी हिराबाईचे वडील नामदेव शंकर लोखंडे (रा. कन्नड) यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. पोलिसांनी सासरा व सासू या दोघांना अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother in law and father in law arrested in married murder case