संदीप आचार्य

नवरात्रौत्सवापासून राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरु झालेल्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाना’अंतर्गत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८८ हजार ४५९ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. राज्यात अन्यत्र महिला आरोग्याची तपासणीने वेग घेतला आहे. तरी, तुलनेत महापालिका क्षेत्रात महिलांच्या आरोग्य तपासणीचा वेग कमी असल्याचे दिसून येते.

महापालिका क्षेत्रात ४९ लाख २३ हजार ६८८ महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली असून, टक्केवारीचा विचार करता ३२ टक्के महिलांच्या आरोग्याची तपासणी झाली आहे. तर, राज्य पातळीवर हेच प्रमाण ४३ टक्के एवढे आहे.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकारातून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाना’ची सुरुवात करण्यात आली. १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. यात राज्यातील तीन कोटी महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार असून, महापालिकांचा सहभाग मोलाचा मानला जातो. महापालिका परिक्षेत्रातील एक कोटी ५३ लाख ६६ हजार ६३४ महिलांची नोंद असून, यातील ३२ टक्के महिलांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यात अन्यत्र आरोग्य विभागाने एक कोटी ५१ लाख ६४ हजार ९५९ महिलांच्या आरोग्याची तपासणी केली आहे. म्हणजेच ४३ टक्के महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे.

हेही वाचा : १ लाख ५९ हजार कोटी जास्त की २ हजार कोटी जास्त?, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना खोचक टोला

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ ही या आरोग्य तपासणी मोहीमेमागची संकल्पना असून, राज्यातील महापालिकांनी तपासणीचा वेग वाढवणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. मुंबई महापालिकेसारख्या सक्षम आरोग्य यंत्रणेने आतापर्यंत केवळ ६.१ टक्के महिलांच्या आरोग्याची तपासणी केली आहे. तर, नांदेड, लातूर, पिंपरी चिंचवड आदी महापालिका क्षेत्रात १५ टक्क्यांपर्यंतच तपासणी झाल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. महिलांच्या आरोग्याची तपासणी वेगाने पूर्ण करण्यास तसेच चाचणीत आजार दिसून आल्यास तात्काळ उपचाराची व्यवस्था करण्यास तानाजी सावंत यांनी सांगितले.

तीस वर्षावरील सर्व महिलांचे कर्करोग, मधूमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू, कान नाक घसा व इतर आजारांचे निदान करण्यात येत आहे. शिबिरांमध्ये अतिजोखमीच्या मातांचे व महिलांचे निदान करून त्यांना आवश्यकतेनुसार उपचार आणि संदर्भ सेवा देण्याचे तसेच जास्तीत जास्त महिलांची आरोग्य तपासणी, शस्ञक्रिया होतील याचे नियोजन करण्यात आलेले आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा : “माझ्याशी समोरासमोर चर्चेला या,” आदित्य ठाकरेंचं पत्रकार परिषदेतून CM एकनाथ शिंदेंना खुलं आव्हान

या कालावधीत मानवविकास कार्यक्रमाअंतर्गत तज्ञांची शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. भरारी पथकांमार्फत देखील त्यांच्या कार्यक्षेञात येणाऱ्या गावांमध्ये सेवा पुरविण्यात येत आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत महिला व बाल कल्याण विभागाच्या समन्वयाने तपासणी आणि समुपदेशन कार्यक्रम आखण्यात येत आहेत.