एक लाख रुपयांसाठी पोटच्या बारा वर्षांच्या मुलीची आईने एका तरुणाच्या मदतीने पुण्याजवळील कला केंद्रात विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणाने संबंधित मुलीवर दोन वेळा बलात्कार केल्यानंतर कला केंद्रावर नेऊन नाचण्यास लावले. या ठिकाणाहून कशीबशी सुटका करून घेऊन ती मुलगी पुण्यात आली. पुण्यातील एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या सोबत पोलीस ठाण्यात गेल्यानंतर सुरुवातीस तक्रार नोंदवून घेण्यास तिथे टाळाटाळ करण्यात आली. अखेर वरिष्ठ स्तरावरून चक्रे फिरल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यां अपर्णा दुबे (वय ३४) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून त्रिमूर्ती कला केंद्राची मालकीण संगीता, मुलीची आई, मुलीच्या विक्रीसाठी मदत करणारा तरुण दीपक चक्रधर, दत्ता आणि इतर दोघांच्या विरुद्ध अपहरण, बलात्कार, डांबून ठेवणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मूळची परळी येथील आहे. ती सोलापूर येथील एका वसतिगृहात सातवीत शिकत होती. उन्हाळी सुट्टीमध्ये ती गावाकडे गेल्यानंतर मे महिन्यात तिच्या आईने आरोपी चक्रधर आणि दोन मित्रांना घरी पाठविले. चक्रधरने मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर त्याने मुलीस सांगितले की, तुला एक लाखात विकले आहे.
त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी शिवा, दत्ता व संगीता यांनी तिला मोटारीत घालून जबरदस्तीने पुण्याजवळील खेड तालुक्यातील साबळेवाडी येथील त्रिमूर्ती कला केंद्र येथे आणले. त्या ठिकाणी पायात घुंगरू घालून जबरदस्तीने नाचण्यास लावले. त्याला पीडित मुलीने विरोध केला असता केंद्राची मालकीण संगीताने तिला मारहाण केली. त्यानंतर दोन दिवसांनी चक्रधर याने त्या ठिकाणी येऊन बलात्कार केला. त्यानंतर संगीताने त्या मुलीस दोघांबरोबर एका लॉजवर पाठविले. त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. हा सर्व प्रकारामुळे असाहाय्य झालेल्या या मुलीने ही माहिती सोलापूर येथील वसतिगृहाच्या संचालिका सायरा शेख यांना सांगून सुटका करण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी पुण्यात सीआयडीमध्ये काम करणारे सहायक पोलीस निरीक्षक वजीर शेख यांना फोन करून मदत करण्यास सांगितले.
मुलीने रविवारी सकाळी कला केंद्रातून सुटका करून घेत पुणे स्टेशन गाठले. त्या ठिकाणी दुबे, शेख व इतर महिला सहकारी उपस्थित होत्या. ते तिला बंडगार्डन पोलीस ठाण्यात घेऊन गेले. पण, येथील वरिष्ठ अधिकाऱ्याने तक्रार नोंदवून घेण्यास सुरुवातीस नकार दिला. पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे यांनी आदेश दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करून तो चाकण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्ह्य़ाचे गांभीर्य ओळखून चाकण पोलिसांनी कसून तपास सुरू केला असून एका शिवा नावाच्या व्यक्तीला रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.
आईकडून बारा वर्षांच्या मुलीची एक लाख रुपयांना विक्री
एक लाख रुपयांसाठी पोटच्या बारा वर्षांच्या मुलीची आईने एका तरुणाच्या मदतीने पुण्याजवळील कला केंद्रात विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
First published on: 01-10-2013 at 12:17 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother sales her 12 year old daughter for 1 lakh