मुंबई विद्यापीठअंतर्गत कोकणाला लाभलेल्या अथांग सागरकिनाऱ्याच्या पाश्र्वभूमीवर सिंधू स्वाध्याय संस्था समिती निर्माण करून अभ्यासक्रम एन.आय.ओ.च्या पाश्र्वभूमीवर घेण्याचा विचार मुंबई विद्यापीठ बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमन डॉ. विनायक दळवी यांनी विद्यापीठासमोर ठेवला जात असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
श्री पंचम खेमराज महाविद्यालयात विद्यापीठअंतर्गत महाविद्यालय प्राचार्याची बैठक झाली. विद्यापीठ बी. सी. यू. डी.चे संचालक डॉ. राजपाल हांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी डॉ. विनायक दळवी, डॉ. गौतम झोळंबे, डॉ. निसार शेख, डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. नीता दुर्वे आदी उपस्थित होते.
या वेळी डॉ. राजपाल हांडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सर्व महाविद्यालयाचे मुंबई विद्यापीठाचे समन्वयक प्रतिनिधी म्हणून पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप भारमल यांचे नाव जाहीर केले. या वेळी विद्यापीठाअंतर्गत प्रश्नपत्रिका इंटरनेटमार्फत दिल्या जातील असेही स्पष्ट केले.
या वेळी डॉ. विनायक दळवी म्हणाले, अमेरिकन स्टाइल क्रीडा उपक्रमाला श्री पंचम खेमराज महाविद्यालयाने चांगला प्रतिसाद दिला. एक विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला त्याचे कौतुक केले, तसेच विद्यापीठअंतर्गत केलेल्या कामांची माहिती दिली.
मुंबई विद्यापीठअंतर्गत सिंधू स्वाध्याय संस्थेची निर्मिती करून कोकणच्या सागराच्या पाश्र्वभूमीवर अभ्यासक्रम सुरू करण्याचे समितीने धोरण ठरविले आहे. हा प्रस्ताव मुंबई विद्यापीठाच्या संचालक मंडळासमोर जाईल. तसे झाल्यास कोकणातील विद्यार्थ्यांना सागरी अभ्यासक्रमाचा फायदा होईल असे डॉ. विनायक दळवी यांनी स्पष्ट केले.
मुंबई विद्यापीठाने बायोडायव्हर्सिटी रिचर्सला प्राधान्य दिले. त्याला सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्य़ातील संशोधकांनी सहकार्य करून प्रतिसाद दिला असे डॉ. विनायक दळवी म्हणाले. सिंधू स्वाध्याय केंद्र निर्माण व्हायला थोडा वेळ लागेल असे त्यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाने पेपरफुटी प्रकरणी दखल घेऊन एक समिती गठित केली ही समिती सध्या यावर उपाय शोधत आहे असे संचालक डॉ. राजपाल हांडे यांनी स्पष्ट केले. त्या समितीचे डॉ. दळवी हे चेअरमन असून, २५ जणांच्या या समितीने विद्यापीठाच्या प्रत्येक विभागाला सुधारण्यासाठी उपाय सुचवायचे आहेत असे डॉ. हांडे म्हणाले.
पेपरफुटीप्रकरणी उपाय म्हणून चाळीस सूचना सुचविल्या जात आहेत. या समितीच्या चार बैठका झाल्या असे समितीचे अध्यक्ष डॉ. विनायक दळवी यांनी बोलताना सांगितले. योग्य प्रशासन असेल तर पेपरफुटी थांबविता येईल असे त्यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठअंतर्गत महाविद्यालयात पूर्वी सीलबंद पेपर दिले जायचे. पण सध्या परीक्षेच्या तीन दिवस अगोदर पाकिटातून पेपर दिले जातात. या पेपरचे पाकीट फोडून पुन्हा बंद करणे शक्य होते. ते थांबविले पाहिजे. त्यासाठी विशिष्ट कलरचे सील करून त्यावर शिक्का मारणे हा एक उपाय सुचविला असे डॉ. दळवी म्हणाले.
पेपरचे पाकीट सील करून एका ट्रंकमध्ये घालून कोड नंबरचा ट्रंक महाविद्यालयाकडे द्यायचा अशा ४० मुद्दय़ांची पेपरफुटी टाळण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. नियोजन व अंमलबजावणी चांगली असली तर सारे थांबेल असे ते म्हणाले.
पेपर प्रिंटिंग प्रेसला सभोवती आर्मीसारखे जाळीचे कपाऊंड पाहिजे. संरक्षण व गुणनियंत्रक अधिकारी नेमणे तसेच महाविद्यालयात पोलीस संरक्षण द्यावे असे आपण सुचविले असे डॉ. दळवी म्हणाले.
मुंबई विद्यापीठअंतर्गत आविष्कार कार्यक्रमात येथील महाविद्यालयातील विद्यार्थी चमकतील असे डॉ. राजपाल हांडे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा