सातारा शहरातील प्रियंका मंगेश मोहिते या वीसवर्षीय युवतीने आज सकाळी सव्वा अकरा वाजता जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले. एव्हरेस्ट सर करणारी महाराष्ट्राची ती तिसरी महिला गिर्यारोहक ठरली आहे.
हरयाणातील ‘ओशन टू स्काय’ या समूहासोबत प्रियंका एव्हरेस्ट मोहिमेसाठी गेली होती. कर्नल नीरज राणा यांच्या नेतृत्वाखाली आठ मुलगे आणि दोन मुली या संघात सहभागी झाल्या होत्या. यातील कर्नल राणा यांच्यासह आठजणांनी आज एव्हरेस्ट शिखर सर केले.
वीसवर्षीय प्रियंकाला लहानपणापासूनच गिर्यारोहणाची आवड आहे. तिने यापूर्वी सहय़ाद्री आणि हिमालयात भटकंती केली आहे. याशिवाय उत्तर काशी येथील ‘नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ माऊंटेनिअरिंग’मध्ये तिने गिर्यारोहणाचे शिक्षण घेतले आहे.
गेल्या महिन्यापासून तिची ही एव्हरेस्ट मोहीम सुरू झाली होती. सरावानंतर चालू आठवडय़ात तिने अंतिम चढाई सुरू केली. या प्रवासातच आज सकाळी सव्वाअकरा वाजता तिने हे सर्वोच्च शिखर सर केले.
मुलींना पाठिंबा द्या
एव्हरेस्ट यशाची पहिली बातमी प्रियंकाने आपल्या वडिलांना कळविली. यानंतर तिच्या घरी याबद्दल पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. प्रियंकाने एव्हरेस्टसाठी घेतलेल्या कष्टांचे सार्थक झाल्याचे सांगत तिचे वडील मंगेश यांनी सर्वच पालकांनी मुलींना अशा साहसी खेळांसाठी पाठिंबा द्यावा असे आवाहन केले. अशा उपक्रमांमधून मुलींमध्ये खऱ्याअर्थाने आत्मविश्वास तयार होतो असेही ते म्हणाले.
प्रियंका सध्या साताऱ्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. गिर्यारोहणाबरोबर तिला नृत्यातही विशेष रुची आहे. तिची आई गृहिणी आहे. तर नोकरदार असलेले वडील आणि भावासही खेळाची आवड आहे.
‘एनसीसी’च्या छात्रांची भरारी
दरम्यान, भारतीय लष्कराच्या मार्गदर्शनाखाली गेलेल्या ‘एनसीसी’च्या मोहिमेत ८ छात्रांनी नुकतेच हे सर्वोच्च शिखर सर केले. देशभरातून निवडलेल्या या ‘एनसीसी’ छात्रांच्या मोहिमेत एकूण १८ सदस्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये १४ सदस्यांनी प्रत्यक्ष चढाईत भाग घेतला, तर चौघांनी एव्हरेस्टचा तळ सांभाळला. सुभेदार जगतसिंग आणि कर्नल एस. सी. शर्मा यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. गेल्या १९ व २० मे रोजी यातील ८ एनसीसी छात्र आणि ३ लष्करी जवानांनी हे शिखर सर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा