नेपाळमधील भूकंपामुळे भारतीय पर्यटकांचे कुटुंब जेवढे चिंतेत आहेत, तेवढीच चिंता एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेल्या गिर्यारोहकांच्या कुटुंबीयांनाही आहे. तब्बल दोन दशकांनंतर एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेल्या बिमला नेगी देऊस्कर यांचे कुटुंबीयसुद्धा तेवढेच चिंतेत होते. मात्र, दुपारच्या सुमारास अ‍ॅडव्हान्स बेस कॅम्पमधून त्या सुखरूप असल्याचा संदेश आला आणि त्यांचे पती अविनाश देऊस्कर यांनी सुटकेचा श्वास सोडला. तरीही भूकंपात आठ गिर्यारोहकांचे बळी गेल्याने सातत्याने ते तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
बिमला नेगी देऊस्कर अपघातानेच गिर्यारोहणाच्या क्षेत्रात आल्या. मुळच्या उत्तरकाशीतील बिमला नेगी यांचा गिरीशिखरांचा संबंध तसा लहानपणापासूनचा. केवळ गिर्यारोहणाचा बेसिक आणि अ‍ॅडव्हान्स कोर्स केल्यानंतर स्थानिकांना शिष्यवृत्ती मिळते म्हणून त्यांनी तो केला, पण त्यामुळे स्वत:तील क्षमतांची जाणीव त्यांना झाली.
मध्यमवर्गातल्या असल्याने मोहीम फत्ते करण्यासाठी लागणारा पैसा त्यांच्याकडे नव्हता. संधी येत गेली आणि त्या पुढे सरकत गेल्या. छोटेमोठे शिखर सर करत असतानाच नागपुरातील आउटवर्ड बाउंड भारतचे संचालक अविनाश देऊस्कर यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. १९९३ साली भारत-नेपाळ या देशांची महिलांची पहिली संयुक्त मोहीम एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी निघाली. या मोहिमेच्या त्या सदस्य होत्या. मात्र, त्यावेळी एव्हरेस्ट शिखर त्यांना सर करता आले नाही. त्यापूर्वी त्यांनी २३ हजार फुटावरचे मोमोटँग कांगरी आणि आजवरचे सर्वात उंच शिखर कामेट पादाक्रांत केले होते. त्यांच्या या हिमतीला दाद देत भारत सरकारचा मानाचा समजला जाणारा अर्जून पुरस्काराच्या बरोबरीचा ‘शेरपा तेनसिंग गोरजे’ राष्ट्रीय साहस पुरस्कार देऊन त्यांना १९९४ मध्ये गौरवान्वित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी नागपुरातच साहस या प्रकारात महिलांनी समोर यावे म्हणून काम सुरू केले. केदारनाथला ढगफुटी झाली तेव्हाही त्यांच्या नेतृत्त्वाखालील महिलांचा ग्रुप त्या भागात गिर्यारोहणासाठी गेला होता. परिस्थिती बघून परतून न येता अनेकांना त्यांनी संकटातून बाहेर काढले.
तब्बल दोन दशकानंतर त्या आता पुन्हा एव्हरेस्ट शिखर गाठायला गेल्या आहेत. नेपाळच्या भूकंपानंतर त्यांचे पती अविनाश देऊस्कर यांच्याशी संपर्क साधला असता त्या सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
चीनच्या सीमेकडून त्यांची चढाई सुरू आहे आणि सध्या त्या २१ हजार फुटावर अ‍ॅडव्हान्स बेस कॅम्पमध्ये आहेत. नुकताच त्यांचा सुरक्षिततेचा संदेश आल्याने आम्हीही सुटकेचा श्वास सोडला आहे, तरीही संबंधित घडामोडींकडे आमचे सातत्याने लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader