छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथेने प्रेरित मुंबईतील गिर्यारोहक हमिदा खान यांनी महाराष्ट्रातील ४७० किल्ले सर केले आहेत. १९९० साली हमिदा यांनी युथ हॅास्टेलच्या मदतीने गिर्यारोहणाचा प्रवास सुरू केला. गड किल्ल्यांवर केवळ भटकंतीच न करता त्यांचं संवर्धन व्हावं या उद्देशाने १९९९ साली खऱ्या अर्थाने त्यांचा प्रवास सुरू झाला. त्या वर्षभरात हमिदा यांनी १०० गड किल्ल्यांना भेट देत त्याबद्दलची माहिती संकलन केली. त्यानंतर २००० साली १५० किल्ले सर केले. २००१ साली १०० किल्ल्यांना त्यांनी भेटी दिल्या. अशा रितीने त्यांनी अवघ्या तीन वर्षात तब्बल ३५० किल्ले सर केले.
या भटकंतीच्या प्रवासात त्यांनी एक अपरिचीत किल्लाही शोधून काढला. तसंच सर्व किल्ल्यांचा अभ्यास, माहिती संकलित केली आहे. महाराष्ट्रासह त्यांनी इतर राज्यातील जवळपास ६०० किल्ल्यांना भेट दिली असून हिमालयातील अनेक मोहिमाही केल्या आहेत. त्यांच्याच पुढाकारामुळे आज रायगडावर नवरात्रोत्सव गावकरी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त गड-किल्ले भ्रमंतीचा ५०० चा आकडा पूर्ण करण्याचा हमिदा यांचा निर्धार आहे.