केंद्र तसेच राज्यातील भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने बंद पाडण्याचा या सरकारचा डाव असल्याचा आरोप विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे यांनी येथे बोलताना केला. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गावागावात या सरकाच्या विरोधात लढा उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पक्षाच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या दुष्काळी परिषदेत वळसे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड, नगरचे महापौर अभिषेक कळमकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब भापकर, जिल्हा बँकेचे संचालक उदय शेळके आदी यावेळी उपस्थित होते.
एफआरपीनुसार उसाला भाव न दिल्यास साखर कारखानदारांवर गुन्हे दाखल करण्याचा दम राज्य सरकारकडून दिला जात असल्याचे सांगून यावेळी वळसे म्हणाले, साखरेचे दर कोसळल्यामुळे राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त कारखाने पुढील हंगामात बंद राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने बंद करण्याचा घाट या सरकारने घातला आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्री परदेशात जाऊन एकीकडे विदेशी गुंतवणूक वाढवण्याचा देखावा निर्माण करीत आहेत तर, दुसरीकडे कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी काहीही मदत दिली जात नाही. शेतीमाल, फळे तसेच दुधाला भाव नाही. उपभोक्त्याला स्वस्त देण्याचा विचार केला जात असताना पिकविणाऱ्या शेतकऱ्याचा मात्र विचार होत नाही हे दुर्दैव आहे, असे वळसे म्हणाले.
दुष्काळासारख्या गंभीर प्रश्नाकडे सकराकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी केला. सुजित झावरे यांनी तालुक्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेताना यापुढील काळात पिण्याचे पाणी टँकरमध्ये कुठून भरायचे हाच प्रश्न आहे, असे सांगितले.

Story img Loader