शेंडापार्क येथे असलेले कुष्ठधाम बंद करण्याच्या हालचाली शासकीय पातळीवर सुरू आहेत. या माध्यमातून या ठिकाणी असलेला भूखंड लाटण्याचा प्रयत्न बडय़ा धेंडय़ांकडून सुरू आहे. या विरोधात येथील कुष्ठपीडित लोकांनी शासकीय हालचालींना विरोध करण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी व राज्य शासनाविरूध्द दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर कोल्हापूर येथे दावा दाखल केला आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर व अ‍ॅड.नरेंद्र गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. हा दावा भीमा बाबू कंबळकर, इब्राहिम बाबालाल शेख यांनी कुष्ठधाममधील नागरिकांच्यावतीने दाखल केला आहे.
शेंडापार्क परिसरात १९४४ साली राजाराम छत्रपतींनी कुष्ठरूग्णांचे पुनर्वसन करण्याच्या हेतूने ५५१ एकर जमीन देऊन कुष्ठधामची स्थापना केली. आत्तापर्यंत त्यातील ४१४ एकर कृषी महाविद्यालय, ३० एकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व १२ एकर आयटी पार्कला देण्यात आली आहे. आता केवळ ९७ एकर जमीन उपलब्ध आहे. याच जागेमध्ये कुष्ठरोग्यांवर उपचार करण्यासाठी कुष्ठधाम ही कुष्ठबांधवांची वसाहत व इस्पितळ बांधण्यात आले आहे. येथे दररोज ३५ ते ४० लोक उपचारासाठी येतात. हा सर्व विभाग पूर्णत अनुदानित आहे. गेल्या पाच-सहा महिन्यापासून बाह्य़रूग्ण विभाग बंद आहे. याच कालावधीत येथे कार्यरत असणाऱ्या १८ कर्मचाऱ्यांना इतरत्र वर्ग करण्यात आले आहे. अन्नधान्य व औषधांचा पुरवठा थांबविण्यात आला आहे. याची विचारणा केल्यानंतर रूग्णालय बंद करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.    
कुष्ठधामातील रूग्णांना कुष्ठधाम मोकळे करण्यास सांगितले आहे. शेंडापार्क येथे दवाखाना व निवास बंद केले जाणार आहे. ही सर्व यंत्रणा कोंढवा-पुणे येथे हलविली जाणार असल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर शेंडापार्कची जागा अन्य कारणांकरिता विकण्याचे प्रयोजन राज्य शासनाने नियोजिले आहे. याबाबत विचारणा केली जाता काहीही स्पष्ट सांगितले जात नाही. शेंडापार्क मध्ये सध्या १२० कुटुंबे आहेत.त्यामध्ये साधारणत ३५० लोक असून तेही शेंडापार्क दवाखान्यामध्ये उपचार घेतात. हा दवाखाना बंद झाला तर त्यांच्यावर उपचार होऊ शकणार नाहीत. शेंडापार्कची जागा विकली तर ही सर्व १२० कुटुंंबे रस्त्यावर येणार आहेत. यावर अखेरचा उपाय म्हणून इथल्या कुष्ठपीडित लोकांनी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी व राज्य शासनाच्या विरोधात दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्यामध्ये कुष्ठपीडितांच्यावतीने अ‍ॅड.नरेंद्र गांधी, अ‍ॅड.पी.ए.राऊत, अ‍ॅड.प्रसन्न भालेकर काम पाहत आहेत.