कराड : उसदर साडेतीन हजार रुपये देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी उद्या शुक्रवारी (दि. २५) राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचा देण्यात आलेला इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेअंती तसेच सहकार मंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीमुळे मागे घेण्यात आल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सहकारी मंत्र्यांसमवेत उद्या शुक्रवारी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिल्याने मुख्यमंत्री शिंदेंचा पहिलाच आणि भरगच्च कार्यक्रमातील कराड दौरा संवेदनशील बनला होता. मात्र, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात काहीशी सकारात्मक चर्चा होताना, राज्याच्या सहकारमंत्र्यांनीही येत्या मंगळवारी (दि. २९) मुंबईमध्ये बैठकीचे निमंत्रण दिल्याने शेट्टी यांनी चक्काजाम आंदोलनाचा पवित्रा बदलला. चर्चेतून सकारात्मक निर्णयाची आशा त्यांनी बाळगली आहे. आणि त्यातून ‘वेट अॅन्ड वॉच’ अशी सबुरीची भूमिका शेट्टी यांनी घेतली आहे. मात्र, मुंबईतील बैठक फिसकटल्यास येत्या ३० नोहेंबरपासून चक्काजाम आंदोलनावर आम्ही ठाम राहू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.