मंत्री धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांनंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा मुंडे यांनी काही महिन्यांपूर्वी शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला होता आणि आपण सक्रिय राजकारणात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर त्या आता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. करुणा शर्मा यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणुक लढवण्याची घोषणा केली आहे. त्या त्यांच्या शिवशक्ती सेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार असतील. करुणा शर्मा मुंडे या निवडणुकीच्या तयारीला लागल्या असून त्या एका वक्तव्यामुळे सध्या चांगल्याच चर्चेत आहेत.
“चित्रपट काढायचा असेल तर सर्वात मोठा विषय मीच आहे, करुणा धनंजय मुंडे. महाराष्ट्रातलं राजकारण कसं आहे आणि इथली नेतेमंडळी कशी आहे, इथल्या सर्वसामान्य लोकांची काय स्थिती आहे हे मला माहीत आहे. मी गेल्या २५ वर्षांपासून राजकारण पाहत आले आहे. ४३ वर्ष हे राजकारणात यायचं वय नाही. २२-२५ व्या वर्षी राजकारणात आले असते तर माझं भविष्य राजकारणात असतं. पण मी किती जगेल हे माहीत नसतानाही राजकारणात यायचं आणि लोकांसाठी आवाज उठवण्याचं कारण म्हणजे मी घरात गेल्या २५ वर्षांपासून राजकारण पाहिलंय. त्यामुळे माझ्यावर आणि धनंजय मुंडेंवर चित्रपट बनवल्यास तो खुप हिट होईल, असं करुणा शर्मा मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.” तसेच आपल्याला कोणाचीही भीती वाटत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
करुणा शर्मा यांची मोठी घोषणा, २०२४ ला देणार धनंजय मुंडेंना लढत; म्हणाल्या “संपूर्ण जगात…”
दरम्यान, कोल्हापूर पोटनिवडणुकीबाबत एबीपी माझाशी बोलताना करुणा शर्मा मुंडे यांनी सांगितलं होतं की, “माझा लढण्याचा कोणताही विचार नव्हता. एक महिन्यांपूर्वी मी पत्रकार परिषद घेऊन आली तेव्हा अनेक लोक, उमेदवार भेटले. निवडणुकीला मी उभं राहावं अशी सर्वांची इच्छा आहे. आज इतके पक्ष आहेत आणि १३ कोटी जनता आहे पण परमबीर सिंग सारख्या व्यक्तीला देश सोडून जावं लागलं. आज इतका भ्रष्टाचार सुरु असून कोणीही आवाज उठवत नाही. म्हणून मी निवडणुकीला उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे”.
कोण आहेत करुणा शर्मा मुंडे?
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मुंबईतील एका महिलेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला होता. त्या महिलेचं नाव होतं करुणा शर्मा. करुणा यांनी थेट राज्यातील कॅबिनेट मंत्र्यावर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकारण बरंच तापलेलं पाहायला मिळालं. करुणा शर्मा यांच्याबद्दल उपलब्ध माहितीनुसार, त्या मूळच्या मध्यप्रदेशमधील इंदूरच्या आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून कामाच्या निमित्ताने मुंबईत राहतात. त्या मुंबईतील ‘जीवनज्योत’ या सामाजिक सेवा संस्थेशी संबंधित आहेत, असं त्यांनी फेसबुकवर म्हटलंय.