कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : करोना महामारीच्या संकटामुळे यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा केला जाणार आहे. दरवर्षी वसई-विरार भागात गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या चलचित्रांचा देखावे साकारले जातात. परंतु या वर्षी करोनाच्या महामारीमुळे चलचित्रांचे देखावे साकारणाऱ्या कलाकारांना रद्द करावे लागले आहे.

नायगाव पूर्वेतील जूचंद्र येथील बहुतेक ठिकाणच्या घरात गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवाच्या निमित्ताने चलचित्रांचे देखावे साकारले जातात. यामध्ये विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि अध्यात्मिक या विषयांवर भाष्य करून एकापेक्षा एक अशी उत्कृष्ट मांडणी करून चलचित्रे उभारली जातात. यासाठी एक ते दोन महिने आधीपासून मूर्ती तयार करणे, त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करणे अशी विविध प्रकारची कामे हाती घेतली जातात. परंतु या वर्षी करोनाचे संकट असल्यामुळे या वर्षी चलचित्रे साकारता आली नसल्याचे कलाकारांनी सांगितले आहे.

करोनामुळे या वर्षीचा गणेशोत्सव हा साधेपणाने साजरा करण्यात यावा, अशा सूचना शासनाने केल्या आहेत. त्यामुळे जूचंद्र येथील कलाकारांनी हाच निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात साकारण्यात येणारे चलचित्र समाजप्रबोधन करणारी व आकर्षक असल्याने विविध ठिकाणांहून नागरिक चलचित्र पाहण्यासाठी गर्दी करतात. या गर्दीमुळे करोना संसर्गाचा फैलाव होण्याची शक्यता आहे यामुळे यंदाच्या वर्षी चलचित्र न साकारता साधेपणाने उत्सव साजरा केला जाणार आहे.

अनेक वर्षांपासूनची परंपरा खंडित

जूचंद्र हे कलावंताचे गाव असल्याने या भागात समाजात घडणारे ज्वलंत विषय घेऊन समाजप्रबोधनपर देखावे तयार केले जातात. ही परंपरा मागील ३० ते ४० वर्षांपासून अविरतपणे जोपासली जात होती. परंतु या वर्षी करोनामुळे समाजप्रबोधन करणारे देखावे साकारता न आल्याने यामध्ये खंड पडणार आहे.

नागरिकांचे मनोरंजन आणि समाजप्रबोधन व्हावे यासाठी मी मागील ३५ ते ४० वर्षांपासून चलचित्र देखावे तयार करतो. या वर्षी करोना महामारीचा विषय घेऊन चलचित्र साकारण्याचा मानस होता. परंतु हा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत गेल्याने हा रद्द करावा लागला. इतक्या वर्षांत पहिल्यांदा चलचित्र दाखविता येणार नाही याची खंत आहे.

– भालचंद्र भोईर, चलचित्रकार, वसई

दरवर्षी नावीन्यपूर्ण चलचित्र देखावे आम्ही तयार करतो. ते तयार करताना वेगळाच आनंद मिळतो, परंतु यंदा सर्व काही ठप्प झाले आहे. त्यामुळे या वर्षी चलचित्र तयार करता येणार नाही.

– संतोष पाटील, चलचित्रकार, वसई

Story img Loader