राज्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच नेत्यांची व आमदार, खासदारांची उपस्थिती होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे मात्र बैठकीस गैरहजर होते. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून अमोल कोल्हे हे नाराज असल्याच्या चर्चाही प्रसारमाध्यमांवर येत आहेत. त्यात आता या महत्त्वपूर्ण बैठकीसही ते गैरहजर असल्याचे समोर आल्याने, चर्चांना अधिकच जोर आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत प्रसारमाध्यमांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना खासदार अमोल कोल्हे यांच्या गैरहजेरीबाबत विचारले. तेव्हा अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या गैरहजेरीमागचं नेमकं कारण सांगितलं.

हेही वाचा – “..आम्ही काय मूग गिळून बसलेलो नाही” अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा!

अजित पवार म्हणाले, “अमोल कोल्हे हे नाशिकला आहेत, त्यांचा स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंदर्भातील कार्यक्रम सुरू आहे. काल पहिला दिवस होता, जी मालिका असते ती चार ते पाच दिवस चालते. कारण, मोठा सेट उभारावा लागतो. काल स्वत: छगन भुजबळ हे त्यांच्यासोबत होते. आज बैठकीला छगन भुजबळ आले आहेत. जयंत पाटील यांनाही अमोल कोल्हेंनी सांगितलं आहे आणि छगन भुजबळ यांच्याकडेही निरोप दिला आहे, की ही मालिका असल्याने मला आता चार ते पाच दिवस पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत तिथून हलता येणार नाही. म्हणून ते आले नाहीत, यातून गैरसमज निर्माण करण्याचं काम कृपया कोणी करू नये.”

हेही वाचा – “तारीख पे तारीख तो होने वाली है” सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयावर अजित पवारांची प्रतिक्रिया!

या अगोदर बैठकीबाबत माहिती देताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले की, “पक्षाची पुढील रणनीती काय असावी? तसेच मागील काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत. या घटना घडत असताना, समोरचा सत्ताधारी पक्ष त्यातून एक वेगळ्याप्रकारची वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत असतो. महागाई व बेरोजगारीच्या समस्येवरून जनतेचं लक्ष्य दुसरीकडे वळवण्याचा त्यांचा साधारण विचार असतो. अशा विविध गोष्टी आहेत, त्या संदर्भात चर्चा झाली आणि यातून आमच्या पुढील काही गोष्टी ठरलेल्या आहेत. काल यासंदर्भात जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. परंतु आज शरद पवारांची शस्त्रक्रिया असल्याने त्यांनी आम्हाला एकत्रित बसून चर्चा करा आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवार वेळ देतील. त्यावेळी या सर्वाला अंतिम स्वरूप द्यायचं असं आमचं बैठकीत ठरलं आहे.”