भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा काल ८१वा वाढदिवस झाला, या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या भाषणात, “२६ खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधान होते, तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रातून पंतप्रधान का होऊ शकत नाही?” असं विधान केलं होतं. यावरून आता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी खासदार कोल्हे यांना टोला लगावल्याचं दिसत आहे.

“फरक आहे… पराभवाच्या भीतीने शरद पवार यांनी माढा मतदार संघातून माघार घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडून आले. त्यामुळे साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याशी मोदींची तुलना नको.” असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलेलं आहे.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने मुंबईत नेहरू सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलत असताना अमोल कोल्हे यांनी शरद पवारांचे कौतुक करत त्यांनी देशाचे नेतृत्व करावे अशी मागणी केली होती.

“आता काळाची गरज आहे, देशात परिस्थितीत कुरक्षेत्रात झाली आहे. त्यामुळे पुढील वर्षात महाराष्ट्र आणि देश कसा असावा याचा विचार करावा लागणार आहे. यासाठी सेनापती म्हणून शरद पवार आज आपल्यासोबत आहे. त्यांच्या विचारांना घेऊन आपल्याला पुढे लढावे लागणार आहे,” असे अमोल कोल्हे म्हणाले होते.

“गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते, तर..”; अमोल कोल्हेंची शरद पवारांना देशाचे नेतृत्व करण्याची विनंती

“आज देशभरात जातीपातीचे राजकारण सुरू आहे. धार्मिक उन्माद उफाळून आला आहे. प्रत्येक समाजामध्ये टोकाच्या भूमिका निर्माण झाल्या आहे. त्यामुळे देशाला पवार साहेबांच्या नेतृत्त्वाची गरज आहे. जर २६ खासदार असलेली गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकते तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रामध्ये महाराजांचा मावळा हा सर्वोच्च स्थानी का विराजमान होणार नाही. असा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे,” अशी भावना अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली होती.